चुलता-चुलतीला लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण

Published on -

Ahmednagar News : शेतीचा वाद व आमचे शेतापासुन लांब गव्हाचे काड पेटुन दे, असे म्हणाल्याचा राग आल्याने पुतण्यांनी चुलता व चुलतीला लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे दि.९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी घडली.

श्रीकृष्ण जगन्नाथ राजदेव, वय ५५ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे राहतात. त्यांच्या शेता शेजारीच त्यांचा भाऊ शिवाजी जगन्नाथ राजदेव याची शेती आहे. त्यांची शेती पुतण्या संभाजी राजदेव, विक्रम राजदेव, विजय राजदेव असे तिघे करतात. शेतीचे कारणावरुन चुलते व पुतणे दोघांमध्ये वाद होत असतात. विक्रम शिवाजी राजदेव यांने चार पाच दिवसापुर्वी त्यांचे शेतातील मक्याचे पीकावर औषध मारले होते.

त्या औषधामुळे श्रीकृष्ण राजदेव यांच्या शेतातील बांधाच्या कडेचे घासाचे पीक जळाले होते. त्यानंतर दि. ९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजे दरम्यान विजय राजदेव याने त्याचे शेतातील गव्हाचे काड पेटुन दिले होते. त्यामुळे श्रीकृष्ण राजदेव यांच्या शेतातील दोन गुंठे मका जळाला.

या बाबत श्रीकृष्ण राजदेव हे विजय राजदेव याला म्हणाले, तू आमचे शेतापासून लांब गव्हाचे काड पेटुन दे, असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने विजय राजदेव व इतर दोन पुतण्यांनी श्रीकृष्ण राजदेव, त्यांची पत्नी व मुलाला शिवीगाळ करुन लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही जर परत येथे आला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

घटनेनंतर श्रीकृष्ण जगन्नाथ राजदेव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी विक्रम शिवाजी राजदेव, विजय शिवाजी राजदेव, संभाजी शिवाजी राजदेव, सर्व रा. ब्राम्हणी, ता. राहुरी. या तिघांवर गुन्हा रजि. नं. ४२५/२०२४ भादंवि कलम ३२३, ३२४, ३२५, ४३५, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News