Ahmednagar News : पोराने आईस्क्रीम मागितली पण ते न्यायलाही पैसे नाही.. कांदा विक्री केलेला शेतकरी हतबल.. बाजारभाव 1 हजारांवर

Published on -

Ahmednagar News : कांद्यामधून मोठे अर्थार्जन मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली असते. परंतु सध्या हा कांदा शेतकऱ्यांचे वांदे करताना दिसतोय. मागील चार महिन्याप्सून शेतकरी अक्षरशः रडवेला झाला आहे. निर्यातबंदी केल्याने शेतकरी अगदीच मेटाकुटीला आहे.

नगर बाजार समितीत गुरुवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला १२०० ते १५०० रुपये भाव मिळाला. शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू असताना सध्या समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे.

परिणामी, काढलेला कांदा थेट विक्रीपेक्षा चाळीत साठवणूक करण्याला शेतकरी प्राधान्य देत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांत उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात कांद्याला भाव कमीच राहतो.

दिवाळीत अडीच ते तीन हजारांपर्यंत गेलेले कांद्याचे भाव डिसेंबर २०२३ मध्ये शासनाने निर्यातबंदी घातल्यानंतर थेट दीड हजारांपर्यंत खाली आले. दरम्यान, गुरुवारी नगर बाजार समितीत ५३ हजार २८२ गोण्या (२९ हजार ३०६ क्विंटल) कांद्याची आवक झाली. यात प्रथम प्रतीच्या कांद्याला १२०० ते १५०० प्रतिक्विंटल भाव मिळाला.

शेतकरी हतबल

शेतकरी कांद्याला कमी भाव मिळत असल्याने एकदम हतबल झाला आहे. मार्केटमध्ये कांदा आणून विकला पण खर्च व विक्री यांचा ताळमेळ घातला व उसने पैशांची बेरीज लावली तर काहीच पदरात राहत नाही. पोराने आईस्क्रीम मागितली पण ते न्यायलाही पैसे नाही अशी स्थिती सध्या झालीये असे एका हतबल शेतकऱ्याने सांगितले.

साठवणुकीवर भर

गेल्या चार महिन्यांपासून कांद्याला समाधानकारक भाव नसल्याने सध्या विक्रीला येत असलेल्या कांद्याची आवक रोडावली आहे. उन्हाळी कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, भाव नसल्याने शेतकरी चाळीत कांदा साठवत आहेत.

गुरुवारचे कांदा भाव (प्रतिक्विंटल)

एक नंबर कांदा १२०० ते १५०० रुपये

दोन नंबर कांदा ८०० ते १२०० रुपये

तीन नंबर कांदा ४०० ते ८०० रुपये

हलका कांदा १५० ते ४०० रुपये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe