लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाकडून ४२६ गुन्हे दाखल २३३ लोकांना अटक

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि.२६ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत.

राज्यात सायबर संदर्भात ४२६ गुन्हे दाखल झाले असून २३३ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४२६ गुन्ह्यांची (ज्यापैकी २५ N.C आहेत) नोंद २५ मे २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की,

आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १७८ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २२ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत.

तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्याप्रकरणी ४७ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २३३ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०५ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात यश आले आहे.

 जळगाव

जळगाव जिल्ह्यातील धारणगाव पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे सदर जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३१ वर गेली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणाऱ्या आशयाची पोस्ट टाकली होती त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

पुणे ग्रामीण

पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील मंचर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे सदर विभागातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३४ वर गेली आहे .

सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअॅपद्वारे कोरोना महामारीबद्दल व कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येबद्दल चुकीची व खोटी माहिती असणारे मेसेजेस विविध व्हाट्सॲप ग्रुप्सवर फॉरवर्ड केले होते ज्यामुळे परिसरात संभ्रम निर्माण झाला होता.

ऑनलाईन व्यवहारात सावधान

सध्या लॉकडाऊनच्या काळात बरेच लोक स्वतःचे आर्थिक व्यवहारसुद्धा ऑनलाईन व विविध ॲप्सद्वारे करत आहेत जसे पेटीएम,भीम,गुगलपे,इत्यादी. यातील काही वापरकर्त्यांना एक एसएमएस येतो कि तुम्ही खालील नंबरवर फोन करून किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करून आपले केवायसी अपडेट करण्यास सांगितले जाते.

अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका व त्या मेसेजमधील लिंकवर देखील क्लिक करू नका. असे मेसेज हे खरे आहेत का नाही याची आधी सत्यता पडताळून, खात्री करून घ्या.

असे मेसेज व त्यातील लिंक्स या बऱ्याचदा फेक असतात सदर फेक लिंकद्वारे सायबर भामटे हे त्या वापरकर्त्यांची सर्व माहिती जमा करण्याचा प्रयत्न करतात व तसे करून त्या माहितीचा उपयोग अन्य मोठा आर्थिक गुन्हा करण्यासाठी केला जाऊ शकतो.

त्यामुळे अशा मेसेजेस पासून सावध व सतर्क रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment