देशासह राज्यात परिवर्तन घडेल

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News : देशात सध्या हुकूमशाहीने राजवट चालवली जात आहे. हे घातक आहे. जनतेत आता मोठा असंतोष आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात परिवर्तन घडेल, असा दावा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

संमिश्र सरकारच देशाला विकसित बनवू शकते, असे सांगताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

भारत राष्ट्र समितीचे जळगावचे जिल्ह्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी शनिवारी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. पाटील यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

भाजप, वंचित बहुजन आघाडी भारत राष्ट्र समिती (बीआरस) असे विविध पक्षांतून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या आशेने आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी मजबूत होत असल्याचे सांगत ठाकरे पुढे म्हणाले, राज्यात आणि देशात मोदी सरकारविरोधात असंतोष आहे.

तो आता मोठ्या प्रमाणात आणि उघडपणे व्यक्त होत आहे. संमिश्र सरकारच्या काळात देशाची प्रगती झाली आहे. आम्हाला देश मजबूत पाहिजे, सरकार संमिश्र पाहिजे. सर्वांना सोबत घेणारे आणि संमिश्र सरकार इंडिया आघाडी देऊ शकते. हे सरकार देशाला प्रगतिपथावर नेईल, असा दावा ठाकरेंनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe