बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट या वांद्रे येथील इमारतीवर रविवारी पहाटे दोन बाइकस्वारांनी गोळीबार केला. त्यातील एक गोळी इमारतीच्या भिंतीला लागली. या घटनेमुळे बॉलिवूडसह संपूर्ण देशभरात खळबळ उडाली.
गोळीबार झाला त्यावेळी सलमान घरातच होता. या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. सलमानला इशारा देण्यासाठी हे कृत्य केल्याचे गँगचे म्हणणे आहे. सलमान गॅलेक्सी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटुंबीयांसह राहतो. या इमारतीच्या बाहेर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास दोन बाइकस्वारांनी पाच गोळ्या झाडल्या.
गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली
सध्या तिहार तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई या बिश्नोई टोळीप्रमुखाचा भाऊ अनमोल याने तशी फेसबुक पोस्ट रविवारी केली. त्यात त्याने आज झालेला गोळीबार हा फक्त ट्रेलर होता, असे नमूद केले. खान, तुला आमची ताकद दाखविण्यासाठी हा हल्ला केला आहे.
तुझ्यासाठी हा शेवटचा इशारा आहे. यानंतर मोकळ्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत. बाकी जास्त काही बोलण्याची मला सवय नाही, असे म्हटले आहे.
काय आहे बिष्णोई गॅंग
लॉरेन्स बिश्नोई हा सध्या तिहार जेलमध्ये असून तो तिथून सूत्रं हलवत असतो असे म्हटले जाते. याचीच ही गॅंग असून ती बिष्णोई गॅंग नावाने परिचित असल्याचे सांगितले जाते. तो मूळचा पंजाबमधल्या फाजिल्का इथला आहे. कॉलेजमध्ये असताना त्याच्या गर्लफ्रेंडला जिवंत जाळण्याची घटना घडली होती,
या घटनेनंतर लॉरेन्स याने बदला घेण्यासाठी सगळ्या मारेकऱ्यांना कॉलेजमध्येच गोळ्या घालून मारले होते. त्यानंतरही त्यानं अनेक हत्या केल्या असल्याचे पोलीस सांगतात. तो सध्या कारागृहात असला तरी तो तेथूनच सूत्रे हलवतो त्याच्या हुकुमावरुन गुन्हे करणाऱ्या लोकांच्या तो सतत संपर्कात असतो असेही म्हटले जाते.
सलमान का आहे त्यांच्या टार्गेटवर?
१९९८ साली राजस्थानमध्ये ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळविटाची हत्या केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला होता. बिश्नोई समाजात काळ्या हरणांना पवित्र मानले आहे. त्यामुळे काळविटाची हत्या केल्याचा आरोप लागल्यापासून अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर आहे.