Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. दरम्यान, या नवीन वर्षात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात राज्यात प्रत्येक महिन्याला अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे.
गेल्या मार्च महिन्यात राज्यात काही ठिकाणी वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचे सावट होते. परिणामी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या चालू एप्रिल महिन्यातही अशीच परिस्थिती तयार झाली आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पाऊस झाला आहे. विशेष बाब अशी की, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये गारपिट झाल्याची नोंदही करण्यात आली आहे.
त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे परंतु शेती क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान कालपासून वादळी पावसाची तीव्रता कमी होणार असे बोलले जात होते. मात्र अशातच हवामान खात्याने महाराष्ट्रात आणखी पाच दिवस पावसाचे सावट राहू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.
कुठे बरसणार वादळी पाऊस
15 एप्रिल : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 15 एप्रिलला राज्यातील कोकण विभागातील उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मुंबईमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे. दुसरीकडे आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
16 एप्रिल : आयएमडीने 16 एप्रिलला राज्यातील मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर, जालना हे जिल्हे वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय, राजधानी मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.
18 एप्रिल : गुरुवारी सुद्धा पावसाचा अंदाज आहे. या दिवशी राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या 6 जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे.
19 एप्रिल : महाराष्ट्रात 19 एप्रिल ला देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या दिवशी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा या विभागात पाऊस हजेरी लावू शकतो असा अंदाज आहे. कोकण विभागातील सिंधुदूर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड या 3 जिल्ह्यात अशा एकूण सात जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
20 एप्रिल : 20 एप्रिलला राज्यातील मराठवाड्यातील धाराशिव आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर या 2 जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या संबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.