Ahmednagar News : यात्रेत नाचण्यावरून ‘राडा’ ! ‘बड्या’नेत्याला धुतले, मग मध्यरात्री नेत्याने घरात घुसून महिलांसह सहा जणांना बेदम मारले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून मारहाणीबाबत एक महत्वाचे वृत्त आले आहे. श्रीगोंदे तालुक्यातील वांगदरी येथे यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.

या राड्यामध्ये गावातील एका मोठ्या नेत्याला तरुणांनी मारहाण केली. नंतर या नेत्याने वचपा काढण्यासाठी स्वतः कार्यकर्त्यांसह मध्यरात्री मारहाण करणाऱ्या तरुणांच्या घरात घुसून चार महिलांसह सहा जणांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.

त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी गावात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. याबाबत उशिरापर्यंत दोन्ही गटांकडून पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.

वांगदरी येथील अंबिका देवीच्या यात्रोत्सवानिमित्त रविवारी (१४ एप्रिल) कुस्त्यांच्या हगामा पार पडला. त्यानंतर रात्री ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम सुरू असताना, काही तरुणांनी गाण्यावर नाचण्यास सुरुवात केली.

त्यावर पोलिसांनी या तरुणांना शांततेचे आवाहन मात्र, तरुणांनी पोलिसांसोबतच हुज्जत घातली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ शांत करण्यासाठी गावातील नेत्याने हस्तक्षेप केला. त्यामुळे तरुणाचा राग अनावर झाला.

‘तुम्ही आम्हाला सांगणारे कोण’ असे म्हणत तरुणांनी त्यांच्याशीही वाद घालण्यास सुरुवात केली. गर्दीत अंधाराचा फायदा घेत काही तरुणांनी नेत्यावरच हल्लाबोल केला.

नेत्याला धक्काबुक्की करीत त्यांचा शर्ट फाडला. त्यामुळे नेत्याचा राग अनावर झाला. मारहाण करणाऱ्या तरुणाच्या मासाळवाडी येथील घरी कार्यकर्त्यासह मध्यरात्री जाऊन तेथील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यात वृद्ध पुरुष व महिलांनाही जबर मारहाण केली. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर अभंग यांनी गावाला भेट दिली. गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

गावात तणावपूर्ण शांतता होती. याबाबत दोन्ही गटांकडून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe