Ahmednagar Breaking : पैलवानकीचे स्वप्न पाहत कुस्तीचे धडे घेणाऱ्या पैलवानाला मृत्यूने गाठत कुस्तीच्या आराखड्यातच चितपट केले. सरावादरम्यान या पैलवानास हृदयविकाराचा झटका आला व तो मृत्युमुखी पडला.
ही घटना अहमदनगरधील राजूर येथे घडली. मुलाने कुस्ती क्षेत्रात नाव करून ऑलिम्पिक स्पर्धेत खेळावे असे असणारे त्याच्या पालकांचे स्वप्न क्षणात चक्काचूर झाले. मच्छिंद्र लक्ष्मण भोईर (वय २४, रा.देवठाणा, जि. हिंगोली ( मूळ गाव )) असे मृत पैलवानाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी : आपल्याकडे सुविधा नाहीत म्हणून हिंगोली जिल्ह्यातून आपल्या मुलाची पाठवणी पालकांनी राजूरमध्ये केली. तेथे तो कुस्तीचे धडे घेत होता. त्याचा मेहनती स्वभाव असल्याने तो व्यवस्थित शिकतही होता.
त्याने सरावादरम्यान इतर ठिकाणी जात काही कुस्त्या जिंकल्याही होत्या. परंतु हे सर्व सुरु असतानाच नियतीने कुस्तीच्या आराखड्यातच त्याला गाठले. सोमवारी सरावादरम्यान त्यास हृदयविकाराकाह झटका आला व तो मृत्यू पावला.
पैलवान मच्छिंद्र लक्ष्मण भोईर नामक या कुस्तीपटूच्या पालकांनी राजूरमधील कुस्ती केंद्रातील कुस्तीपटूंचा नावलौकिक ऐकून त्याला लॉकडाऊनपूर्वी प्रशिक्षणासाठी तेथे दाखल केले होते. उत्कृष्ट शरीरयष्टी, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तो नावलौकिक मिळवत होता.
आपल्या मेहनतीच्या जोरावर तो भल्याभल्यांना आपल्या कुस्तीच्या डाव-प्रतिडावाने चितपट करत होता.परंतु आता त्याला सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने तो मृत्युमुखी पडला.
मच्छिंद्र हा रविवारी रात्री पारनेर तालुक्यातील साकुर मांडवे येथे कुस्ती आखाड्यात गेलेला होता. येथे त्याने आपली चुणूक दाखवत अंतिम कुस्ती जिंकत पंधरा हजार रुपयांच्या रोख रकमेसह चांदीची गदा आपल्या नावावर केली होती.
ही गदा त्याचे अंतिम बक्षीस ठरले. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मछिंद्र याने रौप्य पदक पटकवले होते. एका आवडत्या शिष्याला आपण मुकलो असल्याची प्रतिक्रिया त्याच्या प्रशिक्षकांनी दिली आहे.