Ahmednagar News : एखादी कला, विद्या यामध्ये जर पारंगत व्हायचे असेल तर सराव हा महत्वाचा असतो. आपल्याकडे अनेक कला, विद्या यांचा अनमोल ठेवा होता. परंतु काळाच्या ओघात या कला नामशेष पावत गेल्या.
परंतु त्यातील काही अशा कला आहेत की त्या आजही सरावाने आत्मसात करण्यात येतात. दरम्यान आता अहमदनगरमधील एका पाचवीमधील मुलाची पोहोण्याची कला पाहून सध्या सगळेच हैराण झाले आहेत.
हा दहा अकरा वर्षाचा चिमुरडा पाण्यात तासंतास तरंगत राहतो, तेही हात पाय न हलवता…त्याचे वडील तर सांगतात की तो तब्बल पाच तास हात पाय न हलवता विहिरीत पाण्यावर तरंगत राहतो. या मुलाचे नाव आहे कृष्णाराजे पांडुरंग जगदाळे.
श्रीगोंदे येथील महादजी शिंदे विद्यालयातील पाचवीतील हा विद्यार्थी आहे. कृष्णा याच्याकडे पाण्यात पोहण्याचे अनोखे कौशल्य आहे. पाण्यात हातपाय न हलवताही तो तरंगत राहू शकतो. त्याच्या पोहण्याचे प्रात्यक्षिक मंगळवारी (१६ एप्रिल) सकाळी १० वाजता महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील स्विमिंग पूलमध्ये दाखवण्यात आले. त्यावेळी सुमारे पाऊण तास पाण्यावर हातपाय न हलवताही तरंगत राहण्याचे कसब कृष्णाने दाखवले, तसेच हे करीत असतानाच त्याने पाण्यावर सुप्त पद्मासनासारख्या अवघड आसनांचेही प्रात्यक्षिक दाखवले.
जंगलेवाडी येथील जगदाळे यांचा कृष्णा हा मुलगा. पाचवीत शिकतो. वजन ५५ किलो. लहानपणापासून त्याला पोहण्याची आवड होती. त्यातूनच पोहण्याचे एक वेगळे कसब मिळवले. हातपाय न हलवताही तो पाण्यावर तरंगत राहू शकतो.
त्याचे वडील पांडुरंग जगदाळे यांनी सांगितले की, जंगलेवाडी, श्रीगोंदा कारखाना येथील शेतातील विहिरीत सुमारे पाच तास सलग हालचाल न करता, पाण्यावर तरंगत राहण्याचे कौशल्य कृष्णाने करून दाखवले आहे.त्याच्या या अनोख्या कौशल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेव भोस, जनरल बाँडी सदस्य बाजीराव कोरडे, शिक्षक वृंद, पालक आदींनी भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पालकांची इच्छा
भविष्यात आपल्या मुलाला या क्षेत्रामध्ये जागतिक विक्रम करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची इच्छा आहे. त्या दृष्टीने आम्ही देखील त्याला त्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्याचे पालक सांगत आहेत.