Ahmednagar News : ‘शासनाचा आदेश जिल्हा बँकेने डावलला, शेतकऱ्यांकडून वसूल केले पीककर्जाचे व्याज ! आता लोक आक्रमक झाल्यावर व्याज परताव्याची नामुष्की’

Published on -

Ahmednagar News : जिल्हा सहकारी बँकेने मार्च अखेर वाटप केलेल्या पीककर्जाची वसुली केली. शेतकऱ्यांनीही भरणा केला. परंतु शासनाचा आदेश होता की, नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करू नये. असे असले तरी बँकेने हा आदेश डावलला.

आता शेतकरी संघटना, लोक आक्रमक झाल्यानंतर या शेतकऱ्यांकडून वसूल केलेले व्याज पुन्हा माघारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे व्याज २२ एप्रिलपूर्वी जमा होणार आहे. शेतकरी संघटनेच्या प्रयत्नामुळेच बँकेवर व्याजाचे पैसे परत करण्याची नामुष्की ओढवली असल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.

नेमका काय होता आदेश?
जिल्हा सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जावर राज्य व केंद्र सरकारकडून व्याजाची सवलत दिली जाते. नियमितपणे शेतकऱ्यांनी कर्ज फेडले तर ते यासाठी पात्र होतात. मात्र केंद्र व राज्याकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर व्याजाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत होते.

सुरुवातीला मात्र कर्जाची मुद्दल व व्याज दोन्हींची वसुली केली जात होती. यंदा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सहकार खात्याने आदेश जारी करत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ मुद्दल वसूल करावी. त्यांच्याकडून व्याजाची वसुली करू नये, असे म्हटले होते.

२२ एप्रिलपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे वर्ग होतील
मात्र तरीही नगर जिल्हा सहकारी बँकेने आदेश डावलले होते. शेतकऱ्यांकडून मुद्दल व व्याजाची सरसकट वसुली करण्यात आली होती. त्यावर शेतकरी संघटनेने आक्षेप घेतला होता.

त्यानंतर बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी नव्याने आदेश काढत वसूल करण्यात आलेले व्याज परत केले जाईल, अशी सारवासारव करण्यात आली होती. अखेर शेतकऱ्यांचे व्याजाचे पैसे परत देण्याची नामुष्की बँकेवर ओढवली.

बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनी पत्रक प्रसिद्ध करत २२ एप्रिलपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे वर्ग होतील, असे सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News