जेव्हाही आपण नवीन वाहन खरेदी करतो तेव्हा ते वाहन खरेदी केल्यानंतर आपण त्या वाहनाचा विमा उतरवत असतो. कारण वाहन हे रस्त्यावर चालणारे असल्यामुळे केव्हा कुठल्या प्रकारचा अपघात किंवा घटना घडेल हे आपल्याला अजिबात सांगता येत नाही. तसेच बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीमुळे देखील वाहनांचे नुकसान होते.
अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही कार घेतलेली असेल व कारचे असे काही नुकसान झाले तर मात्र फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक बोजा तुमच्यावर येऊ शकतो. त्यामुळे कार घेताना त्या कारसाठी विमा कव्हर घेणे खूप गरजेचे आहे.

यामध्ये जर तुम्ही काही आवश्यक विमा आणि ॲड ऑन कव्हर घेतले असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज भासत नाही. अशा काही परिस्थितीमध्ये जर तुमच्या वाहनाचे नुकसान झाले तर संपूर्ण खर्च संबंधित विमा कंपनी उचलते.
वाहन विमा अर्थात वेहिकल इन्शुरन्सचे तीन प्रकार
1- थर्ड पार्टी इन्शुरन्स– प्रत्येक वाहनाकरिता थर्ड पार्टी इन्शुरन्स आवश्यक असतो. समजा तुम्ही नवीन कार विकत घेतली असेल व तुमच्या कारमुळे जर अपघात झाला व त्यामध्ये एखाद्या व्यक्ती जखमी झाला किंवा मरण पावला तर अशा तिसऱ्या व्यक्तीला या थर्ड पार्टी इन्शुरन्स च्या माध्यमातून विमा कव्हर करत असतो.
अशा परिस्थितीत संबंधित विमा कंपनी संपूर्ण खर्च उचलते. परंतु थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये तुमच्या कारचे झालेले नुकसान आणि तुम्हाला झालेल्या दुखापतीचा यामध्ये समावेश होत नाही.
2- कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स अर्थात सर्वसमावेशक विमा– या प्रकारामध्ये कार मालक किंवा ड्रायव्हरला थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या फायद्यांसह इतर संरक्षण देखील मिळते. दंगल, भूकंप तसेच अपघात इत्यादीमुळे जर कारचे नुकसान झाले तर तुम्ही या विम्या अंतर्गत नुकसान भरून काढू शकतात.
3- पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स अर्थात वैयक्तिक अपघात विमा– हा विमा कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स अर्थात सर्व समावेशक विम्यासारखाच आहे. या प्रकारामध्ये कारचालकासह कारमध्ये बसलेल्या इतर लोकांना देखील अपघाताचे कव्हर मिळते.
याशिवाय ॲड ऑन कव्हर घ्यायला विसरू नका
मुख्य विम्यासोबत ॲडऑन कव्हर देखील घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागेल. परंतु जर तुम्ही मुख्यविमा खरेदीच्या वेळी ॲडऑन कव्हर घेत असाल तर तो फार महाग जात नाही. ॲड ऑन कव्हरचे खालील प्रकारे प्रकार पडतात…
1- वाहनाचा शून्य घसारा– नवीन कार खरेदी करताना झिरो डेप्रिसिएशन ॲड ऑन कव्हर नक्कीच घ्या. किंबहुना वाहन जुने झाले की त्याचे मूल्य कमी कमी होत जाते. असे म्हणतात की दरवर्षी वाहनाचे मूल्ये पाच ते पंधरा टक्क्यांनी कमी होते. अशातच कार खरेदी केल्यानंतर अपघात झाला तर तोटा पूर्णपणे भरून निघत नाही. परंतु जर तुम्ही झिरो डेप्रिसिएशन ऍड ऑन कव्हर घेतलेले असेल तर संपूर्णपणे नुकसान भरून काढले जाते.
2- रोड साईड कव्हर– समजा तुमची कार वाटेत बिघडली किंवा टायर पंचर झाला तर हे कव्हर तुम्हाला मदत करेल. हे कव्हर तुम्ही घेतले असेल तर तुम्हाला एक रुपया देखील खर्च न करता जागेवर सुविधा दिली जाते. तुमची गाडी रस्त्यावर बिघडली आणि ती दुरुस्त होईपर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये राहिला तर विमा कंपनी त्याचे देखील पैसे देते. परंतु या प्रकारांमध्ये काही अटी समाविष्ट असतात.
3- इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट कव्हर– बऱ्याचदा कारमधील इंजिन किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट चालू असते अचानकपणे आग लागते व कोणतेही नुकसान होऊ शकते. अशी परिस्थिती उद्भवली तर इंजिन आणि इलेक्ट्रिक सर्किट कव्हरमुळे नुकसान भरून काढण्यासाठी होणारा जो काही खर्च येतो तो कमी होतो.
4- रिटर्न टू इनव्हॉइस– कार चोरीला गेल्यास ॲड ऑन कव्हरच्या मदतीने तुम्हाला कारची संपूर्ण रक्कम मिळते. तसेच कार नोंदणी आणि करासाठी भरलेली रक्कम देखील मिळते. परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे त्याची वैधता केवळ पाच वर्षासाठीच राहते व पाच वर्षानंतर मात्र त्याचा लाभ घेता येणार नाही.