अहमदनगर लोकसभा : कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला लीड मिळणार ? आमदार आपापले गड राखणार का ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : येत्या दोन दिवसात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. अठराव्या लोकसभेसाठी 19 एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होणार आहे. 19 तारखेला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होणार आहे. राज्यात मात्र एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात प्रचार सत्र पाहायाला मिळत आहे. विविध राजकीय पक्षातील नेते पायाला भिंगरी बांधून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील महायुतीचे तथा महाविकास आघाडीचे नेते आपापल्या उमेदवारासाठी जय्यत प्रचार करत आहेत. खरंतर लोकसभेची निवडणूक झाली की तीन-चार महिन्यांनी लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला विधानसभा निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.

या रंगीत तालीममध्ये जे पक्ष आघाडी घेतील त्यांना विधानसभा निवडणूकीला सुद्धा फायदा मिळणार आहे. यामुळे सध्या सर्व आजी-माजी आमदार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील लीड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी सर्व आजी-माजी आमदार मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून तथा महाविकास आघाडी कडून आजी-माजी आमदारांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

लोकसभेला कोणत्या विधानसभा मतदारसंघातून किती मताधिक्य मिळते यावरच आगामी विधानसभेचे उमेदवार ठरतील अशी शक्यता देखील राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात रंगतदार ठरत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राजकीय भूकंप झाले आहेत. राज्यातील दोन मोठे पक्ष फुटलेत. यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची ठरणार आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात जी काही उलथापालथ झाली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील जनता काय कौल देते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे पाटील दोन लाख 81 हजार 526 मतांनी विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत विखे पाटील यांना दक्षिणेतील सर्वच विधानसभा मतदारसंघात चांगले मताधिक्य मिळाले होते.

मात्र, गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला नगर दक्षिण मध्ये मोठा फटका बसला. गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरीतून शिवाजीराव कर्डिले आणि कर्जत-जामखेड मधून राम शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणूकित नगर दक्षिण मध्ये कोणाचे पारडे जड भरणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, या लोकसभेत विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कर्जत-जामखेड मधील माजी आमदार राम शिंदे, राहुरीचे माजी आमदार शिवाजी कर्डिले, शेवगावच्या आमदार मोनिका राजळे, चंद्रशेखर घुले, संग्राम जगताप, राजेंद्र नागवडे हे महायुती मधील आजी-माजी आमदार मैदानात उतरले आहेत.

यामुळे महायुतीला या आजी-माजी आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्य मिळेल अशी आशा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ पारनेर, कर्जत-जामखेड व राहुरी येथील आमदार सक्रिय झाले आहेत. खरे तर, या तिन्ही जागांवर गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार विजयी झालेले आहेत.

यामुळे निलेश लंके यांना या विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळणार अशी आशा आहे तसेच इतरही मतदारसंघात आघाडी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. लंके यांच्या प्रचारासाठी माजी आमदार दादा कळमकर, प्रताप ढाकणे, घनश्याम शेलार, बाळासाहेब भोस हे नेते सक्रिय झाले आहेत. यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके बाजी मारणार की पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आपला गड कायम राखणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

कोणाकडे किती आमदार ?

सध्या दक्षिणेत महायुतीकडे तीन आमदार आहेत आणि महाविकास आघाडीकडे तीन आमदार आहेत. महायुतीकडे शेवगाव पाथर्डी, नगर शहर आणि श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे पारनेर, कर्जत-जामखेड आणि राहुरी या तीन विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. या तीन आमदारांपैकी एक आमदार म्हणजेच पारनेरचे आमदार निलेश लंके हे लोकसभा लढवत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe