Ahmednagar News : बुधवार, (दि. १७) रोजी दुपारी ३ च्या सुमारास केडगावसह नगर तालुक्यातील बहुतांश गावांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. फळबांगाचेही नुकसान झाले आहे.
दमट हवामानामुळे गेली तीन – चार दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. आज दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. केडगाव परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली.
यामुळे प्रचंड उकाड्यातुन काही प्रमाणात सुटका झाली. केडगावसह नेप्ती, निमगाववाघा, चास, अकोळनेर , अरणगाव, वाळकी, बाबुर्डी घुमट, खडकी, खंडाळा, पारेवाडी, पारगाव, सोनेवाडी, पिंपळगाव लांडगा परिसरात वादळी वारा व पावसाने तडाखा दिला.
नेप्ती, खडकी, बाबुर्डी घुमट परिसरात फळबागांचे नुकसान झाले. तसेच कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.