Ahmednagar Loksabha : अठराव्या लोकसभेसाठी अहमदनगर सहित संपूर्ण राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे. उद्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासहित देशभरातील अनेक राज्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील विदर्भातील जागांसाठी मतदान केले जाणार आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे 2024 ला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.तसेच, यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज पासून अर्थातच 18 एप्रिल 2024 पासून सुरुवात झाली आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक मातब्बर नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राजकीय नेत्यांचा ताफा आता गावोगावी हजेरी लावत असताना पाहायला मिळत आहे.
यावेळी नगर दक्षिणसाठी महायुतीकडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने यावेळी पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे शिर्डीसाठी महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार लोखंडे आणि महाविकास आघाडीकडून माजी खासदार वाकचौरे यांना तिकीट मिळाले आहे. दरम्यान, आजपासून दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान आज आपण नगर जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रोसेस कशी राहणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कशी असणार प्रोसेस
लोकसभेसाठी नगर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना कार्यालयात उमेदवारासोबत फक्त पाच जणांना प्रवेश दिला जाणार आहे.
जिल्हाधिकारी महोदय यांच्या कार्यालयापासून शंभर मीटर अंतरावर सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सदर उमेदवाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही याची पडताळणी केली जाणार आहे आणि मग उमेदवाराला अर्ज सादर करता येणार आहे.
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास सुविधा या एप्लीकेशनवरून त्यांना घरबसल्या अर्ज भरता येणार आहे. नगर दक्षिणसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आणि शिर्डीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उमेदवारी अर्ज करता येणार आहे.
तसेच इच्छुक उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयातच उमेदवारी अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दरम्यान उमेदवारीसाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम भरण्यासाठी स्वातंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.