Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातिल शिर्डी मतदार संघात खा. सदाशिव लोखंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान त्यानंतर विधानपरिषदेच्या सभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद पार पडली. परंतु या पत्रकार परिषदेमधील एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
डॉ. निलम गोऱ्हे या माध्यमांशी संवाद साधत होत्या. त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेले राजू वाघमारे चक्क झोपलेले या व्हिडिओत दिसत आहेत. बराच वेळ हे सुरु होते. त्यानंतर निलम गोऱ्हे हे त्यांना हाताने हलवत उठवताना दिसतात. त्यांनी हलवल्यावर वाघमारे खडबडून जागे झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
राजू वाघमारे यांनी नुकताच काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते आणि निलम गोऱ्हे हे शिर्डीमध्ये लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. यावेळी निलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या बाजूला राजू वाघमारे बसलेले होते. ते चक्क झोपले दिसत होते.
बराच वेळ माध्यमांचा कॅमेरा त्यांच्यावर असल्याने तो प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. शेवटी निलम गोऱ्हे यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले वत्यांनी हाताने खुणवत त्यांना उठवलं. ‘उठा आता’ असं निलम गोऱ्हे यांनी म्हटल्यानंतर राजू वाघमारे खडबडून जागे झाले असेच जणू काही यात दिसत आहे.
कोण आहेत राजू वाघमारे
राजू वाघमारे हे काँग्रेसचे प्रवक्ते राहिलेले आहेत. नुकतेच त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत राज्यातले काँग्रेसचे नेते हे उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर व शरद पवारांच्या मताने चालतात असा घणाघात केला व शिंदे गट मध्ये प्रवेश केला होता.
शिर्डीत सेना विरोधात सेना
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून खासदार सदाशिव लोखंडे व ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे उभे आहेत. त्यामुळे ही लढत सेना विरोधात सेना अशी आहे.