एका महिन्यातच गुगलचा युटर्न, ‘अहिल्यानगर’ नाव काढलं, आता Google Maps वर पुन्हा अहमदनगर !

Published on -

Ahmednagar Rename Google : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्यातील शिंदे सरकारने अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर असे करण्यास मंजुरी दिली. 13 मार्च 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर असे करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या बैठकीत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, आता अहमदनगरच्या नामांतरणाला केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

मात्र, राज्य शासनाने नगरचे अहिल्यानगर असे नामकरण केल्यानंतर गुगलने एक मोठा निर्णय घेतला होता. गुगलच्या माध्यमातून Google Maps वर अहिल्यानगर असा उल्लेख करण्यात आला होता.

गुगल मॅपवर अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर झळकत असल्याचे पहायला मिळाल्याने अनेकांच्या माध्यमातून यावर समाधान व्यक्त करण्यात आले होते. अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.

महापालिकेने आधीच अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण करण्याचा ठराव  देखील मंजूर केला आहे. मात्र नामांतरणाला अजून केंद्राची मंजुरी मिळालेली नाहीये.

यामुळे जोवर केंद्राची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत अधिकृतरित्या अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार नाहीये. हेच कारण आहे की निवडणूक आयोगाने देखील निवडणुकीत अहमदनगरचे जुनेच नाव वापरले जाणार असे जाहीर केले आहे.

नामांतरणाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नसल्याने निवडणूक आयोगाने जुनेच नाव वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गुगल मॅप्स वर झळकत असणारे अहिल्यानगर हे नाव देखील आता गायब झाले आहे.

अवघ्या एका महिन्यातच गुगल मॅप्सवरुन अहिल्यानगर हे नाव गायब झाले असून जुने अहमदनगर हे नाव झळकु लागले आहे. यामुळे सध्या नगरमध्ये नामांतरणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

निवडणूक प्रचारात नामांतरणाचा विषय ऐरणीवर आला

दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अहमदनगरच्या नामांतरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखे यांच्या एका प्रचार सभेत बोलताना सुजय विखे यांची गाडी पुन्हा दिल्लीला जाऊन मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर होईल, असे म्हटले आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी नामकरणास मंजुरी दिलेली आहे. परंतु दिल्लीची मंजुरी बाकी आहे, असं म्हणत प्रचारात नगरच्या नामांतरणाचा मुद्दा छेडला आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe