आंतरजातीय लग्न केल्याने गरोदर महिलेस दमबाजी करत घरावर हल्ला

Ahmednagar News : आंतरजातीय लग्न केले म्हणून, महिला व तिचे पती, सासू सासरे घरात असताना अचानक नात्यातील लोकांनी किरकोळ कारणावरून घरी येऊन महिला गरोदर असताना तिला व घरच्यांना मारहाण करण्यात आल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की आरोपी राजू वसीम इनामदार, अमीर शकील शेख, नारायण बन्सी खंडीझोड, प्रतिक बाळासाहेब साबळे (सर्व राहणार वेस, कोपरगाव) यांनी घरासमोर येऊन २५ एप्रिल रोजी हातात काठ्या व तलवारी घेऊन एकत्र येऊन मोठ-मोठ्याने ओरडून घरात गोंधळ घातला,

तसेच तुम्हाला तलवारीने जिवे मारून टाकू, तुम्ही चुकीचे लग्न केले आहे, तुम्हाला शिक्षा भोगवीच लागेल, असे किती दिवस वाचणार? असे म्हणून शिविगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली व घरावर हल्ला केला,

अशी तक्रार कोपरगाव तालुक्यातील वेस येथील गरोदर विवाहित महिलेने शिर्डी पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी या चार जणांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.