Ahmednagar News : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागात ८१ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याची चोरी झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करुनही दखल घेतली गेली नसल्याने याचिकाकत्यानें औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या फौजदारी याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने पोलिसांना नोटीस बजावली आहे.
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाच्या विद्युत विभागामध्ये ६१ लाख रूपयांच्या विद्युत साहित्याची चोरी झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. तक्रारदार संजय काळे यांनी तक्रार केल्यानंतर संस्थानने केलेल्याअंतर्गत लेखापरीक्षणात चोरीचा आकडा ८१ लाख रूपयांवर गेला.
माहिती अधिकारात लेखापरीक्षण अहवाल मिळाल्यानंतर काळे यांनी शिर्डी शहर पोलीस ठाण्यात व नंतर पोलीस अधिक्षक अहमदनगर यांच्याकडे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले. परंतु तक्रारची दखल न घेतल्यामुळे काळे यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली.
यागुन्ह्यात अपहराची रक्कम एक कोटीहून जास्त असू शकते. परंतु संस्थानचे प्रभारी लेखाधिकारी साहेबराव लंके यांचा अपहराशी थेट संबंध असल्याने त्यांनी अंतर्गत लेखापरीक्षणात सर्व बाबी उघड न करता घाईत लेखापरीक्षण अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला.
अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर यांनी लंके यांना अंतर्गत लेखापरीक्षण विभागापासून दूर ठेवून मूळ आस्थापनेवर पाठवायचे आदेश असताना त्यांनी कागदपत्र हेराफेरी करण्यासाठी विद्युत लेखापरीक्षण अहवाल तयार केला.
सदर प्रकरण लक्षात घेता खंडपीठाचे न्या. एम. एस. पाटील व न्या. एस. पी. ब्रम्हे यांनी पोलीस प्रशासनाला नोटीस काढली. पुढील सुनावणी नऊ मे रोजी होणार आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. प्रज्ञा तळेकर, अॅड. अजिंक्य काळे व अॅड. विशाखा पाटील काम पाहत आहेत.