मंत्री छगन भुजबळ सांगा कुणाचे? महायुतीचे की मोठ्या पवार साहेबांचे ! ऐन लोकसभेच्या तोंडावर पडद्यामागे नेमके काय ?

Ahmednagarlive24 office
Published:
bhujbal

महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेचे शिंदे गट व ठाकरे गट असे दोन गट पडले. तसेच राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी व शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन गट पडले. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.

यामध्ये राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांचे कट्टर मानले जाणारे नेतेही अजित पवार यांच्यासोबत गेले व महायुतीचा एक भाग होत सत्तेत सहभागी झाले. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांचेही नाव अग्रक्रमावर येते.

दरम्यान आता नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी काही ‘राज’कीय वक्तव्ये केल्यामुळे मंत्री छगन भुजबळ सांगा कुणाचे? महायुतीचे की मोठ्या पवार साहेबांचे असे बोल नागरिकांतून उमटू लागले आहेत.

काय म्हणाले मंत्री भुजबळ?
एका मुलाखतीमध्ये मंत्री भुजबळ म्हणाले की, अबकी बार 400 पार अशक्य असून 2014 व 2019 सारखा भाजपचा मार्ग सोपा राहिलेला नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी लोकांमध्ये सहानभूती असून बारामतीमध्ये होणारी लढत दुर्दैवी असल्याचे उद्गारही त्यांनी काढले आहेत.

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती असल्याने लोकसभा निवडणुकीत त्यांना याचा फायदा होऊन मोठा विजय मिळू शकतो असेही ते म्हणालेत.

त्याचप्रमाणे ते म्हणालेत की, बारामतीतील पवार कुटुंबीयांच्यामधील लढत दुर्दैवी आहे. माझ्यासाठी हा थोडा भावूक क्षण असून जे कुटुंब मागील इतकी वर्षे एकत्र लढले ते आता वेगळे झाले असल्याने जे सुरू आहे किंवा जे काही घडतंय ते काही लोकांना अजिबात आवडलेलं नसून असे काही झाले नसते तर बरे झाले असते अशी खंत त्याची व्यक्त केलीये.

‘ते’ माझे वक्तव्य नव्हेच..
दरम्यान या बाबत अनेक मीडियावर बातम्या प्रसारित झाल्यानंतर भुजबळ यांनी युटर्न घेतलेला दिसतो. त्यांनी याबाबत स्पष्ट केले आहे की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी लोकांच्या मनात सहानुभूतीची लाट आहे असे वक्तव्य मी केलेले नाही.

या दोन्ही नेत्यांचे पक्ष फुटल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांत त्यांच्याप्रती सहानुभूती असल्याचे वक्तव्य मी केले होते. शेवटी देशपातळीवर पंतप्रधान मोदी यांचे खमके नेतृत्त्व असल्याने मतदानाच्या वेळेस लोकं सहानुभूती बाजूला ठेऊन नेतृत्वाला मतदान करतात असे मंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe