Ahmednagar News : …नाहीतर हे लोक मला मारून टाकतील, लेकीचा वडिलांना फोन अन पोटचा गोळा आढळला दुर्दैवी अवस्थेत..

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथे बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत २३ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळला होता. सायली अविनाश वलवे (वय २३, रा. मिर्झापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी मयत महिलेचा पती आणि सासू अशा दोघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २८) गुन्हा दाखल झाला आहे. सुभद्रा निवृत्ती वलवे (सासू) आणि अविनाश निवृत्ती वलवे (पती) (रा. मिर्झापूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

त्यांच्याविरोधात सायली वलवे यांचे वडील विजय महिपत पवार (रा. मंगळापूर, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे. माझ्या मुलाच्या गळ्यात तू बळेच पडली. मुलाला चांगली बायको मिळाली असती. असे म्हणून तिची सासू मुलाचे कान भरायची, त्याच्याकडे तक्रार करायची.

त्यामुळे तिला पतीकडून मारहाण होत होती. याबाबत सायली हिने वडिलांना सांगितले होते. दि. २१ एप्रिलला विजय पवार हे सायली यांच्या सासरी गेले, त्यावेळी त्यांची सासू आणि पती या दोघांनी त्यांच्याकडे ट्रॅक्टरचे अवजारे घेण्यासाठी दोन लाख रुपये देण्याची मागणी केली होती. नाहीतर तुमची मुलगी घेऊन जा, असेही त्यांना सांगण्यात आले.

नाहीतर हे मला मारून टाकतील…
शेतीकरिता ट्रॅक्टरचे अवजारे घेण्यासाठी माझे पती यांना दोन लाख रुपये द्या, जर तुम्ही पती व सासू यांना दोन लाख रुपये दिले नाहीतर हे मला मारून टाकतील, असे सायली या त्यांच्या वडिलांना म्हणाल्या होत्या. असेही फिर्यादीत म्हटले आहे. तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास दुमणे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

गळफासाबाबत सासूनेच दिली होती माहिती
घराच्या वरील मजल्यावर असलेल्या बेडरूमच्या खिडकीच्या लोखंडी चौकटीला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत सायली वलवे यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची खबर त्यांच्या सासू सुभद्रा वलवे हिने पोलिसांना दिली होती. खबर देण्याऱ्या सासूविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.