Ahmednagar News : शेवगावमधून तीन शाळकरी मुली पळवल्या, पाच जिल्ह्यात शोधाशोध.. अखेर ‘अशा’ पद्धतीने आरोपीसह मुली सुप्यात सापडल्या

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News :  शेवगाव तालुक्‍यातील तीन शाळकरी अल्पवयीन मुलींचे त्याच गावातील एका तरुणाने अपहरण केले होते. दरम्यान, त्या मुलींच्या शोधार्थ शेवगाव ब स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके तयार करुन रवाना केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित युवकास सुपा (ता. पारनेर) येथून ताब्यात घेत त्या तीनही अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

दि. १९ एप्रिल रोजी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले होते. तब्बल नऊ दिवस स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी पुणे, मुंबई, धाराशिव, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी, चिंचवड आदी ठिकाणी जाऊन आरोपीचे मित्र, नातेवाईक यांच्याकडे शोध घेत, आरोपी व अपहरण झालेल्या मुलींची माहिती घेतली.

याच दरम्यान वेगवेगळ्या दोनशे ते तीनशे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीच्या राहते घरी तसेच अपहरण झालेल्या मुलींच्या घराच्या आजुबाजूची तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती घेतली होती.

शेवगाव शहरातील तसेच अहमदनगरकडे जाणाऱ्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सदर आरोपी हा तीन मुलींना मोटारसायकवर घेऊन जाताना शेवगाव ते अहमदनगर रोडवरील मराठवाडी, या गावापर्यंत दिसून आला होता.

दरम्यान, पोलीस पथके आरोपीची माहिती काढत असताना रविवार दि.२८ रोजी, सुपा परिसरातील एका महिलेने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना फोनवरून तीन मुली व एक मुलगा सुपा परिसरात असल्याची माहिती दिली. त्यानुसार दिनेश आहेर यांनी तत्काळ पथकास मिळालेली माहिती कळवून तीन मुली व त्यांच्यासोबत असलेल्या मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पथकाने सुपा परिसरामध्ये मुली व सोबत असलेल्या मुलाचा शोध घेत सदर तीन अल्पवयीन मुली व त्या मुलास ताब्यात घेतले आहे. पोपट उर्फ पोपट्या शहादेव बोरुडे (वय २०), असे ताब्यात घेण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डिले, सचिन अडबल, संदीप चव्हाण, फुरकान शेख, संतोष खैरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर, भरत बुधवंत, विजय धनेधर’ महिला पोलीस अंमलदार छाया माळी यांच्या पथकाने केली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन तीन मुली व आरोपी यास पुढील तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe