पारनेर मध्ये दोन दिवसांत काय काय घडलं ? विजय औटींचा खा. विखेंना पाठिंबा ते शिवसेनेतून निलंबन…

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला. श्री. औटी यांनी त्यांची भूमिका बुधवारी जाहीर केली.

श्री. औटी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. दरम्यान, औटी यांच्या भूमिकेने पारनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडून गेली असून, चर्चेला उधाण आले आहे.

आपली भूमिका मांडताना श्री. औटी म्हणाले की, पंधरा वर्षे आमदार असताना ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिलं, पाच वर्षांपूर्वी झालेल्या पराभवानंतरही आजपर्यंत ही माणसं माझ्याशी प्रामाणिक राहिली, त्या सर्वांना माझे आवाहन आहे की, सुजय विखे पाटलांचा सक्रिय प्रचार करा आणि पारनेर मधून मताधिक्कय देवून दहशतीचे राजकारण संपवा.

देशात लोकसभेच्या निवडणुका चालू असताना आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या मतदारसंघात देखील निवडणूक सुरू आहे. नगर मधील प्रमुख दोन्ही उमेदवार हे महायुतीचेच आहेत. त्यातील एकाने किती पलट्या मारल्या हे सर्वश्रुत आहे. मात्र, नगरमधून लोकसभेवर जाणारा उमेदवार हा देशाचं हित सांभाळणारा, देशाचं संरक्षण धोरण समजून घेणारा हवाय! प्रशासन आणि पोलिसांना अरे-कारे करणारा नकोय ! त्यांचा बाप काढणारा तर नकोच नको!

हॉटेलमध्ये बसून पैसे वाटणारा उद्या लोकसभेत जाणार असेल तर लोकशाहीच्या हिताचे ते वाटत नाही आणि लोकसभेमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराच्या हिताचं हे नाहीच नाही. त्यामुळे नगरमधील जनतेने उच्चशिक्षीत आणि देशाचं हित विचारात घेत सुजय विखे पाटील यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे आणि त्यांना लोकसभेवर मताधिक्याने निवडून देत पारनेरमधील दहशतीचं राजकारण संपवावं, असे आवाहन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार विजय औटी यांनी सोशल मिडियावर बोलताना केले.

औटी शिवसेनेतून निलंबित

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते विजय औटी यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना शिवसेनेतून निलंबन करण्यात आले आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानंतर पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी गुरुवारी उशिरा औटी यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही समावेश आहे. असे असतानाही औटी यांनी महाविकास आघाडीच्या विरोधातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना पाठिंबा देण्याचा एकतर्फी निर्णय बुधवारी रात्री घोषित केला. निवडणुकीसंदर्भात औटी यांनी दोन दिवसांपूर्वी बोलाविलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारास पाठबळ द्यावे, अशी भूमिका मांडली होती.

मात्र पदाधिकाऱ्यांच्या भावना धुडकावत औटी यांनी विखे यांना पाठिंबा देण्याचा एकतर्फी निर्णय जाहीर केला. औटी यांच्या निर्णयानंतर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे व इतर पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून गुरुवारी सकाळी नगर येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना महाविकास आघाडी सोबत असल्याचे तसेच औटी यांनी परस्पर निर्णय घेतल्याचे सांगितले.

बैठकीनंतर आ. निलेश लंके यांच्याशीही गाडे यांनी पदाधिकारी, शिवसैनिक यांची चर्चा घडवून आणत राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये समेट घडून आणला. राज्यामध्ये महाविकास आघाडी व महाआघाडी यांच्यामध्ये चुरशीने निवडणूक लढवली जात असताना औटी यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेबाबत माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार विजय औटी यांचे पक्षातून तातडीने निलंबन करण्यात येत असल्याचे गाडे यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe