महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर येथील सभेत विरोधी उमेदवाराचा खडसून समाचार घेत विरोधी उमेदवार पावने पाच वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काय केले. त्यांनी विधानसभेत किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी कितीवेळा विधानभवना बाहेर आंदोलने केली असा परखड सवाल त्यांनी विचारला.
महायुतीच्या वतीने नगर तालुक्यातील कामरगाव येथे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ संवादसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे आता पर्यंत कुणावरही टिका न करता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केलेल्या आपल्या विकास कामाच्या जोरावर आपल्या प्रचाराची दिशा ठेवली होती. मात्र सातत्याने विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करत निवडणुकीचे वातावरण गढुळ केल्याने त्यांना चोख उत्तर त्यांनी या सभेतून दिले आहे.
डॉ. विखे म्हणाले की, विरोधकांकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत. त्यांची भाषणे काढून बघा त्यात एकही विकासाचा मुद्दा नाही, तुमच्या मुलांना उज्वल भवितव्य देण्याची एकही घोषणा नाही. कांदा प्रश्नावर आजतयागत त्यांनी कधीही आवाज उठवला नाही. त्यांनी केवळ खासदारकीच्या तिकीटासाठी राजीनामा दिला. हाच राजीनामा त्यांनी जर दुधाच्या प्रश्नावर, कांद्याच्या प्रश्नावर दिला असता तर आम्ही त्यांचा सत्कार केला असता असा टोला सुद्धा त्यांनी लगावला.
केवळ लोकांची सहानभूती मिळविण्यासाठी नौटंकी करण्याचे काम त्यांनी चालवले आहे. जनतेला आता त्यांचे सर्व कारणामे माहित पडले असून येत्या १३ मे रोजी जनता त्यांना चांगलाच धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.