Ahmednagar News : कोपरगाव येथील गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडले असून नदी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नदीकाठच्या गावांमधील शेतकरी हैराण झाले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न उभा राहिला आहे.
प्रचंड होत असलेला वाळू उपसा, नदीपात्रात ठिकठिकाणी टाकलेले बेसुमार विजेचे आकडे, नदीपात्रात खोदलेल्या विहिरी व त्यावर चालवणाऱ्या मोटारी व बेसुमार पाण्याचा उपशामुळे व निसर्गाचा बिघडलेला समतोल तसेच गतवर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊसामुळे दक्षिणगंगा गोदावरी नदीचे पात्र पूर्णतः कोरडे ठाक पडले आहे. दुष्काळाची दाहकता त्यावरून दिसून येत आहे.
तालुक्यातील संवत्सर गावाजवळील हे गोदावरीचे नदीपात्र असून ते पूर्णतः कोरडेठाक पडले आहे. जनावरांच्या पिण्याच्य पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून नदीपात्रात एक थेंबही पाण्याचा दिसत नाही.
तालुक्याच्या गोदावरी नदीच्या पट्ट्यातून, परिसरातून बारा महिने वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र यंदा मार्च महिन्यातच कोरडेठाक पडले आहे. दुष्काळामुळे यंदा जानेवारी महिन्यातच बोअर, विहिरी आटल्याने परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा जानवत आहे. त्यामुळे दक्षिणगंगा गोदावरी पात्राला वाळवंटाचे स्वरूप आले आहे.
पुर्वी वाळूत पाणी साठून रहायचे, परंतू बेसुमार वाळू उपशामुळे आता गोदावरी नदीचे वाळवंट झाले आहे. गोदावरी नदीमुळे परिसराला वैभव प्राप्त झाले होते. परंतू मागील दहा वीस वर्षात नदी पात्रातून प्रचंड बेसुमार वाळू उपसा झाला. पूर्वी तीन ते पाच वर्षे सलग दुष्काळ पडला तरी नदीतील वाळूत पाणीसाठा टिकुन रहायचा.
दक्षिणगंगा असलेल्या गोदावरीचे पात्र पवित्र मानले जात असल्याने जिल्ह्यातील बहुतांश गावातील नागरिक मयत नातेवाईकांचा दशक्रिया विधी कोपरगाव, पुणतांबा परिसरात गोदावरी नदी पात्रामध्ये करतात. मात्र गोदावरी कोरडी पडल्याने दशक्रिया विधी करण्यास अनेक अडचणी येत आहेत.