Ahmednagar News : जायकवाडी प्रकल्पामध्ये पुनर्वसित झालेले तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचे कहेटाकळी गावचे ग्रामस्थ तीव्र पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले असून, गावाला चार-पाच दिवसातून एकदा व तोही अत्यंत कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे.
गावाच्या पायथ्याला अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अथांग पसरलेला नाथ जलाशय, गावातून उघड्या डोळ्याने नाथसागराचे पाणी दिसतेय; परंतू ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी कहेटाकळी ग्रामस्थांची अवस्था झाली आहे.
सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून तरुणांच्या हातात येथील ग्रामस्थांनी कार्यभार सोपविला. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यामंधील समन्वयाच्या अभावामुळे नाकापेक्षा मोती जड झाले आणि पाणीपुरवठा यंत्रणेचा पुरता बोजवारा उडालेला दिसून येत आहे. परिणामी येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांमध्ये दररोज वादावादी, भांडणतंटे होत आहेत.
सध्या लोकसभा निडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामकाजात व्यस्त आहे. त्यामुळे पाणी टंचाई सारखा यक्ष प्रश्न कोणासमोर मांडावा, दाद कोणाकडे मागावी, हे ग्रामस्थांना कळेनासे झाले आहे.
गतकाळात येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाखो रूपये खर्च करुन पिण्याचे पाणी पुरवठा करणा-या अनेकविध योजना राबविण्यात आल्या; परंतू व्यवस्थित नियोजन, योजनेची दुरुस्ती आणि देखभाल यांच्या अभावामुळे सर्व पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरलेल्या दिसून येत आहेत.
पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत पाणी नाही, पाणी असले तरी वीजपुरवठा सुरळीत होत नाही, जलवितरिका फुटली असून, दुरुस्तीकरण सुरु आहे, पाणी ऊपसा करणारा पंप ना दुरुस्त झाला, अशा प्रकारची अनेक कारणे दाखवत गावातील तिन प्रभागांत चार-पांच दिवसांच्या कालखंडाने तो ही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे.
त्यामुळे येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. कायमस्वरुपी सुरळीत व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी मागील वर्षीपासून सुमारे सव्वाकोटी रुपये खर्चाची जलजीवन मिशन योजनेचे काम अडथळ्यांच्या अनेक शर्यती पार पाडत सुरू आहे.
झारीतील शुक्राचार्यांच्या विविध ढंगी काळ्या कारवायामुळे ही योजना रखडली आहे. कासवगतीने सुरू असलेल्या या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम किमान पावसाळ्यापूर्वी तरी पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.