Maharashtra News : लोकसभा निवडणुकीबरोबरच सध्या लग्नसराईची धामधूम सुरू झाल्याने विविध प्रकारच्या फुलांची मागणीदेखील वाढली आहे. फुलांच्या भावात वाढ झाल्याने नवरी- नवरदेवासाठीचा हाराच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे. लग्नामधील मंडपात फुलांच्या सजावटीवर भर दिला जात असून, सजावटीनुसार दर आकारले जात आहेत.
उन्हाळा सुरू झाल्याने लग्नाचे मुहूर्त आहेत. ग्रामीण भागात तसेच शहरात व परिसरात एकाच दिवशी पाच ते दहा लग्न असतात. लग्न समारंभात आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले वधू-वराचे स्टेज सजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलाची सजावट केली जाते.
स्टेज सजवण्यासाठी निशिगंधा, जरबेरा, झेंडू, मोगरा, गुलाब आधी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे शहरटाकळी येथील फुल विक्रेते मल्हारी गादे यांनी सांगितले. जरबेरा, गुलाब, अॅस्टर, निशिगंधा या सुगंधी फुलाच्या मागणीत वाढ झाली आहे.
लोकसभा निवडणूक तसेच लग्नसराईमुळे सुगंधी फुलांना मोठी मागणी आहे. त्यामुळे या फुलाचे भाव वाढले आहेत. दरम्यान, तीव्र उन्हामुळे व पाणीटंचाईने नुकसान झालेल्या फुलांची आवक कमी होण्याची भीती वर्तवली जात आहे.
आवक कमी झाल्यास फुलांच्या किमती आणखी वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. लग्नसराईमुळे जरबेरा, डच गुलाब, ऑर्किड, निशिगंधा, या फुलांना पसंती मिळत आहे. विविधरंगी फुलांच्या गुच्छांच्या मागणीत २५ ते ३० टक्क्याने वाढ झाली.
याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वेग आलेला आहे. यानिमित्त विविध सभा, बैठकासह फेऱ्यांमध्येही सत्कारासाठी फुलहारांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या फुल विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत आहे.
शेती व्यवसायत अजून हार मानलेली नाही. उत्पान्नाच्या आशा जागवीत शेतीत सतत नावीन्यपूर्ण प्रयोग करत आहे. यंदा दुष्काळाचे फुलांची शेती व्यवसायत धोक्यात आले आहे. आहे त्या फुला मधुन चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा मनाशी बाळगून आहे. –मल्हारी गादे, फुल उत्पादक शेतकरी, शहरटाकळी