Ahmednagar News : पाऊस लै पडेल.. भूकंपही होईल.. शेतकरी रडतील व्यापारी मजा करतील ! अहमदनगरमधील प्रसिद्ध विरभद्र देवस्थानचे भाकीत

Published on -

Ahmednagar News : यंदा राज्यात भरपूर पाऊस पडेल, दिवाळी आनंदात होईल, कांद्याचे भाव सत्तरी पर्यंत जातील, ऊसाचे भाव साडेतीन हजारावर जातील, गहू चार हजारावर तर बाजरी तीन हजारावर जाईल, कपाशी दहा हजाराच्या पुढे जाईल, सोयबीन मात्र चार हजारावर राहील असे बाजार भाव असतील.

यात व्यापारी मजा करतील अनं शेतकरी रडतील, असे भाकीत तालुक्यातील भोकर येथील विरभद्र देवस्थान येथील कार्यक्रमात करण्यात आले. या भाकिताची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील श्रीक्षेत्र राजा विरभद्र देवस्थान अर्थात बिरोबा महाराजांच्या यात्रे निमित्ताने गजी ढोल,

पारंपारीक नृत्य, डफ, वान, वह्या गायन, नृत्य सोहळा पार पडला. यावेळी अशोकचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, सेवक सागर खंडागळे, निपाणीवाडगाव येथील रामभाऊ कर्जूले, घमाजी खंडागळे, डिग्रस येथील सत्यवान खाटेकर, ब्राम्हणी येथील सुकदेव वाकडे, रामदास शिंदे, अशोक पतपेढीचे आण्णासाहेब वाकडे, महेश पटारे, पंढरीनाथ मते, बाळासाहेब बेरड आदींची प्रमुख उपस्थिती होती

राजकारण्यांचा हिरमोड
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. या यात्रेत लोकसभेचा कौल कोणाच्या बाजूने झुकेल हे भाकित ऐकायला मिळेल, या आशेने उपस्थीत राजकारण्यांनी कान टवकारले होते. मात्र निवडणुकीविषयी कुठलेही भाकित न वर्तवल्याने अनेकांचा हिरमोड झाला

यंदा पाऊसही खूप
यावेळी झालेल्या भविष्यवाणीत येत्या यावर्षी भरपूर पाऊस पडून पावसाची रेलचेल असेल, मृग, आद्राचा पाऊस चांगला होईल, पेरण्या वेळेवर होतील, पिकं चांगले येतील, मघा नक्षतातील पाऊस जागोजागी होईल, पण काही भागात जमीनी उपळून जाण्या इतका पाऊस होईल,

हत्ती व उत्तरा दोनही नक्षत्र पडतील मात्र, काही कोपरे सुटतील, असे असले तरी दिवाळी आनंदात होईल. चंपाषष्टीला पाऊस होईल तर जानेवारी, फेब्रुवारीत खालच्या भागात गारपीट होईल, त्यांनतर काही भागात जमीन हालल म्हणजेच भुकंप होतील. येत्या वर्षातील कांद्याला चांगला भाव मिळेल, कांदा पन्नाशी ओलंडून सत्तरी पर्यंत जाईल,

पुढच्या वर्षी ऊसाला ही चांगला भाव मिळणार आहे, ऊसाचे भाव तीन हजारांपासून साडेतीन हजारापर्यंत राहतील. गव्हाला चार हजारापर्यतचा भाव मिळेल, हरबरा पाच हजारापर्यंत राहील, बाजरी तीन ते साडेतीन हजारावर जाईल, कापसाला चांगला भाव मिळेल तो दहा हजारांच्या पुढे राहील,

मात्र, सोयाबीन चार हजार ते बेचाळीशे रूपयापर्यंतच जाईल एंकदरीत येत्या सालात व्यापारी मजा करतील अनं शेतकरी रडतील. तर आई व वडीलांची सेवा करणाऱ्यांचे कल्याण होईल, त्यांच्या घरात लक्ष्मी नांदन अनं तसेच माताभगीनींचे रक्षण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News