Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये घमासान ! ‘त्या’ व्हिडिओत राहुल शिंदे पैसे वाटतायेत? शिंदे म्हणतात लंके समर्थकांनीच मारहाण करत लुटले, रोहित पवारांचीही उडी..

Ahmednagarlive24 office
Updated:
rohit pawar

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर मतदार संघात राजकीय वातावरण अगदी निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच तापलेलं दिसले. आता निवडणुकीच्या आदल्या रात्री म्हणजे (दि.१२) पैसे वाटपावरून वातावरण तापले आहे.

यात दोन्ही बाजूने फिर्यादी दाखल झाल्या असून एका गटाने भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला आहे तर शिंदे यांनी लंके समर्थकांनीच आपल्याला अडवत दमदाटी करत चैन लुटून नेल्याचा आरोप केलाय. दोन्ही बाजूने फिर्याद दाखल झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी :

फिर्यादी अनिल दत्तात्रय गंधाक्ते यांनी पोलिसात फिर्याद दिली असून त्यांनी त्यात म्हटले आहे, राहुल शिंदे हे आपल्या कारमधून पैसे वाटप करत होते. मी त्यांचा पाठलाग सुरु केला होता व त्यावेळी त्यांनी लोक जमवून आपणाला मारहाण केली असल्याची फिर्याद दिली आहे.

साक्षीदार वर्षा पांडुरंग गंधाक्ते, पांडुरंग बबनराव गंधाक्ते हे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे यात म्हटले आहे. दरम्यान याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात काही लोक रस्त्यावर पडलेले पैसे दाखवत आहेत व ते पैसे राहुल शिंदे यांचे असल्याचा आरोप करत आहेत.

दरम्यान याबाबत राहुल शिंदे यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपण आळकुटी येथे चाललो होतो. गाडीवरील चालक शरद अंबादास सोमवंशी हा देखील सोबत होता. अनिल गंधाक्ते व सोबतच्या चार-पाच जण मागून आले व त्यांनी आपली कार अडवून आपल्या गाडीची काच फोडली.

अनिल गंधाक्ते याचे हातात रिव्हॉल्वर होता असेही त्यांनी म्हटले आहे. त्यावेळी त्यांनी गाडीतील कागदपत्रे खाली फेकत आपल्या गळ्यातील सोन्याची चैनही काढून घेतली. त्यानंतर आम्हास म्हणाले की तुम्ही पैसे वाटप करीत आहात.

तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो की, तुम्ही आमची गाडी चेक करा व अधिकारी यांना येथे बोलवा. त्यावेळेस त्यानंतर गर्दीतील कोणीतरी त्याचेजवळील पैसे रस्त्यावर आणून टाकले व म्हणू लागले की सदरचे पैसे हे आमच्या गाडीत होते.

गर्दीतील कोणीतरी ती बॅग व कागदपत्रे पैसे तेथून घेऊन गेले असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून अनिल गंधाक्ते यांसह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

रोहित पवार म्हणतात..
वरील घटनेसंदर्भात रोहित पवार म्हणतात, ‘उत्तरे’तून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात ‘नगर दक्षिणे’त पैशांची धुवांधार बरसात… (पारनेर) अपेक्षा आहे की, या पुरात पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वाहून न जाता सुरक्षित असतील!’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe