Ahmednagar Politics : काल मतोत्सवाचा उत्सव महाराष्ट्रात पार पडला. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान काल १३ मे रोजी पार पडले. या टप्प्यात महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदार संघात निवडणूक पार पडली.
यामध्ये अहमदनगर मधील सुजय विखे, पुणे मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर , वंचितचे वसंत मोरे, शिरूर मधील अमोल कोल्हे आदी उमेदवारांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून होते. हे सर्वच नेते अगदी तगडे असून त्यांचे प्रतिस्पर्धी देखील अत्यंत तगडे आहेत.
कालच्या मतदानामध्ये कोट्यवधी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. परंतु स्वतः सुजय विखे-पाटील, संदीपान भुमरे आणि वसंत मोरे या उमेदवारांना स्वतःला मतदान करता आले नाही. होय हे खरे आहे.
याचे कारण असे की, तिथल्या मतदारयादीत त्यांची नोंदच नाही. त्यामुळे त्यांच्यावर स्वतःला मतदान न करता येण्याची वेळ ओढवली.
मतदार यादीत नोंद नाही
हे तीनही उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्या मतदार संघातील मतदार यादीत त्यांची नोंद नाही. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधले महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचा दुसऱ्याच मतदार संघात नावे आहेत.
संदीपान भुमरे यांचे जालना मतदारसंघातल्या पैठणमध्ये तर सुजय विखे यांचे शिर्डी मतदारसंघातल्या लोणीमध्ये तर तिसरे उमेदवार वसंत मोरे यांचं नाव कात्रजमधल्या मतदारयादीत आहे. त्यामुळे हे उमदेवार ज्या मतदार संघात उभे आहेत त्या मतदार संघात त्यांचे नाव नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही.
अहमदनगरपेक्षा शिर्डीत जास्त मतदान
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी समोर आली. यात अहमदनगर लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी एकूण 61 टक्के
तर शिर्डी लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी 62 टक्के मतदान झाले अशी माहिती प्रशासनाकडून समजली. अहमदनगरपेक्षा शिर्डीत मतदानाचा टक्का जास्त आढळून आला.