Maharashtra News : निवडणूक आली की काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून २५ वर्षे मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले ? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मंगळवारी टीका केली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची, महायुतीची मुंबई आहे. त्यामुळे जोवर चंद्र, सूर्य आहेत, तोवर मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी चेंबूर येथे आयोजित जाहीर सभेत शिंदे बोलत होते. महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आपले सरकार आल्यानंतर मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले. पहिला निर्णय दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबईचा घेण्यात आला. मुंबईचे सुशोभीकरण केले जात आहे. आपला दवाखाना सुरू आहे. जागतिक दर्जाचे शहर करण्याचा प्रयत्न आपला आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
मुंबईकर जो बाहेर फेकला आहे, त्याला परत आणण्याचे काम आपले सरकार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यासाठी राहुल शेवाळे यांना तिसऱ्यांदा संधी द्यायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मतदारांना केले.
शेवाळे यांनी मागील दहा वर्षांत मतदारसंघातील एसआरएच्या प्रकल्पांबाबत पाठपुरावा केला. आपण नगरविकास मंत्री असताना पुनर्विकासाचे नियम शिथिल केले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
येत्या २० तारखेला धनुष्यबाणातून मतांचा असा वर्षाव करा, की मशाल विझली पाहिजे आणि धनुष्यबाण आणि राहुल शेवाळे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मजबूत नेतृत्व लाभले आहे. आता भारत मजबूत देश झाला आहे. वाराणसीमध्ये विकासाची गंगा वाहत आहे. काशी विश्वेश्वरात विकास दिसत असल्याचेही शिंदे म्हणाले.