Ahmednagar News : दाळमंडईतील धोकादायक इमारतीचा भाग कोसळला ! ९० वर्ष जुनी इमारत..

Published on -

Ahmednagar News : शहातील दाळमंडई येथील जुन्या इमारतीचा एक भाग बुधवारी (दि. १५) रात्री अचानक कोसळला. ही घटना कळताच महापालिकेच्या बांधकाम आणि अग्निशामक विभागाने गुरुवारी (दि. १६) संयुक्त कार्यवाही करत सदरची धोकादायक इमारत उतरून घेण्यास सुरुवात केली आहे.

दुपारपर्यंत निम्म्याहून अधिक इमारत या पथकाने उतरून घेतली आहे. सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस चालू आहे. तसेच मान्सूनही तोंडावर आला आहे. त्यामुळे शहरातील मान्सूनपूर्व कामांना महापालिकेने सुरुवात केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटीसा देऊन त्या उतरून घेण्याची सूचना करण्यात आलेली आहे. तथापि दाळमंडईतील नारायणदास मोहनदास बोलद्रा यांची जवळपास ९० वर्षे जुन्या असलेल्या इमारतीचा एक भाग बुधवारी रात्री अचानक कोसळला.

त्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने लागलीच सदरची धोकादायक इमारत उतरून घेण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत अग्रिशामक विभागाचे शंकर मिसाळ, बांधकाम विभागाचे इंजि. श्रीकांत निंबाळकर यांच्यासह कर्मचारी सह‌भागी झाले आहेत.

दरम्यान या इमारतीच्या मालकास आणि भाडेकरूंना महापालिकेने नोटीस दिलेली आहे. त्यात म्हटले आहे की, १५ मे रोजी रात्री इमारतीचा उत्तरेचा भाग पडलेला आहे आपली इमारत जी प्लस टू या प्रकारातील व लोड बेरिंग स्वरूपातील आहे त्याचे आयुष्य सुमारे ९० वर्षापेक्षा जास्त आहे तसेच रात्री पडलेला भाग सोडून उर्वरित भाग देखील मोठ्या प्रमाणात कलला आहे त्यामुळे सदर इमारत केव्हाही पडण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पाऊस सांगितलेला आहे. पावसामुळे देखील इमारत कोसळण्याची दाट शक्यता आहे यापूर्वी देखील आपणास वेळोवेळी संपर्क केला परंतु आपण येथील स्थानिक रहिवासी नसून आपल्या गावाचा पत्ता मनपाकडे उपलब्ध झालेला नाही.

१६ मे रोजी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व शहर अभियंता यांच्यासमवेत मनपाचे इतर विभागांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी आपले प्रतिनिधी नितीन वडोदरा व कांतीलाल वडोदरा यांच्याशी देखील संपर्क केलेला आहे. कधीही पाऊस पडण्याची शक्यता असल्याने इतरांना धोका होऊ नये याकरिता इतर यंत्रणेमार्फत काम करून झालेला खर्च आपल्याकडून वसूल करण्यात येईल असे त्यात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News