Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पतसंस्थेतील विविध गैरकारभार, घोटाळे उघडकीस आले आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एका मल्टीस्टेट पतसंस्थेकडून कोट्यावधींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
नगर शहरासह जिल्हाभरात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाखा सुरु केलेल्या ध्येय मल्टीस्टेट पतसंस्थेच्या संचालक मंडळाने जिल्हा भरातील अनेक ठेवीदारांकडून ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गोळा केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकवून ठेवत त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी ध्येय मल्टीस्टेटच्या काही संचालक मंडळावर नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीसह ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ठेवीदाराने गुरुवारी (दि. १६) दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी ध्येय मल्टीस्टेटच्या पाईपलाईन रोडवरील शाखेत १ डिसेंबर २०२२ रोजी १ वर्षाच्या मुदतीवर २ लाख रुपये ठेव ठेवलेली होती.
त्यानंतर पुन्हा १९ ऑगस्ट २०२३ रोजी १ लाख ७५ हजार रुपये १ वर्षाच्या मुदतीवर ठेव ठेवली होती. या ठेवीवर त्यांना १४.४० टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. पहिल्या ठेवीची मुदत संपल्यावर त्यांनी ३ डिसेंबर २०२३ रोजी बालिकाश्रम रोडवरील मुख्य शाखेत चेअरमन यांची भेट घेवून ठेवीची रक्कम व्याजासह मागितली असता सध्या आमच्या कडे पैसे नाहीत, आम्ही जे कर्ज वाटप केलेले आहे,
त्याची वसुली सुरु असून ते पैसे आल्यावर आम्ही तुम्हाला बोलावून घेवून तुमचे पैसे देवू असे सांगितले. त्यानंतर अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. काही दिवसांनी फिर्यादी यांना समजले की ध्येय मल्टीस्टेटच्या सर्व शाखा बंद झाल्या आहेत.
त्यानंतर त्यांनी संस्थेचे व्यवस्थापक यांना फोन केला असता त्यांनी चेअरमन व संचालक १-२ महिन्यांपासून संस्थेत आलेले नाहीत व त्यांचा संपर्कही होत नाही. त्यामुळे तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करा असे सांगितले.
दरम्यान याप्रकरणी जिल्हाभरातील सुमारे ११२ ठेवीदारांनी याबाबत तक्रारी केल्या असल्याची माहिती समजली आहे.
या फिर्यादीवरून फिर्याददार यांच्या सह अन्य ११२ ठेवीदारांच्या ठेवी परत न देता त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी चेअरमन व संचालकांवर भा.दं. वि. कलम ४२०, ४०६ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण (वित्तीय संस्थांमधील) अधिनियम (एम पी आय डी) १९९९ चे कलम ३ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची व्याप्ती मोठी, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार
ध्येय मल्टीस्टेट या संस्थेच्या नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गावागावात शाखा होत्या. त्या सर्व शाखांच्या ठेवीदारांचा विचार करता ठेवीदारांची संख्याही मोठी आहे. आणि अडकलेल्या ठेवींच्या रकमाही अनेक कोटींमध्ये आहेत.
दाखल झालेला गुन्हा व त्यातील ठेवीदारांची संख्या आणि फसवणूक झालेली रक्कम सध्या जरी कमी दिसत असली तरी या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सदरचा गुन्हा लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने एका मीडियाने दिली असल्याची चर्चा आहे.