Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही लोकांनी आता माणुसकीला पूर्णतः काळिमाच फसला आहे की काय असे वाटावी अशी एक घटना समोर आली आहे. एका पुरुषाचा खून करून शरीराचे तुकडे तुकडे करून पाटपाण्यात फेकले असल्याची निर्दयी घटना समोर आली आहे.
ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील देडगांव येथे घडली आहे. येथील पाथर्डी रस्त्यावर असणाऱ्या पाटाच्या पाण्यात पुरुष जातीच्या एका अज्ञात इसमाचे तुकडे करुन एका गोणीत भरुन फेकून दिल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मानव जातीला काळीमा फासणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांच्या कृत्याचा निषेद्ध केला जात असून या घटनेची नेवासा पोलीस ठाण्याचे पो.नि.धनंजय जाधव यांनी गंभीर दखल घेत तपासाचे चक्रे वेगाने फिरवून गुन्हेगार लवकरच जेरबंद करण्यासाठी पोलीस तपास युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहीती दिली आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, देडगांव (ता.नेवासा) येथील पाथर्डी रस्त्याकडे जाणाऱ्या मुळा धरणाच्या पाटात एक मानवी पायाचा मांसांचा तुकडा पाण्यावर तरंगत असल्याची खबर देडगांवचे सरपंच चंद्रकांत भानूदास मुंगसे यांनी गांवचे पोलीस पाटील प्रल्हाद यशवंत ससाणे यांना गुरुवारी (दि.१६) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दिली.
पोलीस पाटील ससाणे हे तातडीने घटनास्थळी दाखल होवून पाटाच्या पाण्यात तरंगत असलेल्या मानव जातीच्या तुकड्याची पाहणी केली. कुजलेल्या अवस्थेतील पायाचा एक तुकडा त्यांना दिसल्यामुळे पोलीस पाटील ससाणे यांनी त्वरित नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांना घटनेची माहीती दिली.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ आणि कुकाणा पोलीस दुरक्षेञाचे पो.ना.किरण पवार यांना घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. पाटाच्या पाण्यात एक मानवी पायाचा मांसाचा तुकडा आणि पाटाच्या पुर्व दिशेला शरिराचा भाग पाण्यात तरंगतांना दिसून आला. तसेच पुढे काही अंतरावर एका पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये अनोळखी मानवी कुजलेले पुरुष जातीचे मुंडके,धडाचा कुजलेला मासांचा तुकडा त्यास करदोरा व गुडघ्याचा कुजलेला मासाचा तुकडा मिळून आलेले आहे.
पोलीसांनी दोन पंचासमक्ष याघटनेचा पंचनामा केलेला असून पोलीसांनी घटनास्थळी मिळून आलेले मानवी शरीराचे व कुजलेले मांसांचे तुकडे हे शवविच्छेदन करण्यासाठी नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केलेले आहे.
पुरुषाचा खून करून त्याच्या शरीराची विल्हेवाट लावण्याकामी व पुरावा नष्ट करणे कामी त्या अनोळखी इसमाच्या शरीराचे तुकडे करून ते गोणीत टाकून पाटाच्या पाण्यात देडगांवच्या हद्दीतील पाथर्डीकडे जाणाऱ्या मुळा धरणाच्या पाटात फेकून देवून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोलीसांना मिळून आल्यामुळे देडगांवचे पोलीस पाटील ससाणे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.