Ahmednagar Politics : औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा दाखल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचासभेदरम्यान केलेल्या भाषणात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी उद्धवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्याद शुक्रवारी देण्यात आली आहे. माजी आमदार नीलेश लंके हे महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी उमेदवार होते.
त्यांचा प्रचार करण्यासाठी अहमदनगर शहरातील क्लेराब्रुस मैदानावर ८ मे रोजी सायंकाळी संजय राऊत यांची सभा झालेली होती. सभेदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना राऊत यांनी औरंगाजेबाच्या जन्मस्थळाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अॅड. मनोज जैस्वाल यांच्यासह इतरांनी निवडणूक शाखेकडे तक्रार दाखल केलेली होती. आता या तक्रारीची दखल घेण्यात आली असून त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून राऊत यांच्यावरील कारवाईबाबत येथील कोतवाली पोलिसांना प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
यानुसार आता कोतवाली पोलिसांनी राऊत यांच्यावर हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समजली आहे. आता यावर पुढील काय प्रक्रिया होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
या कलमानुसार गुन्हा
खासदार राऊत यांनी मोदी यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत गैरवाजवी प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने राऊत यांच्याविरोधात भादंवि कलम १७१ (क), ५०६ व लोकप्रतिनिधी अधिनियम कलम १२३ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावर पुढील काय प्रक्रिया होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.