Porsche Taycan Price : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थातच पुण्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. रविवारी भल्या पहाटे झालेल्या अपघातात एका पॉश कारने एक तरुण आणि तरुणीला चिरडल्याचे घटना समोर आली. एका मद्यधुंद अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याने या घटनेचे संपूर्ण देशभर पडसाद उमटत आहेत. या अपघातात अनिश अवधीया आणि अश्विनी कोस्टा यांचा दुर्देवी अंत झाला आहे.
हे दोघेही मयत सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. दुसरीकडे, गाडी चालवणारा मद्यधुंद अल्पवयीन मुलगा हा एक प्रसिद्ध बिल्डरचा पोरगा आहे. या घटनेत दोन तरुणांचा जीव गेला असल्याने या अल्पवयीन मुलाविरोधात तसेच त्याच्या पालकांविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान ही अपघाताची भीषण घटना झाल्यापासून संपूर्ण देशभर या इलेक्ट्रिक कारची चर्चा रंगली आहे. अशा परिस्थितीत आज आपण त्या पोर्शे इलेक्ट्रिक कारचे फीचर्स आणि किमती बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Porsche Taycan इलेक्ट्रिकचे फिचर्स कसे आहेत ?
Porsche Taycan ही एक प्रीमियम आणि लक्झरी इलेक्ट्रिक कार आहे. भारतात ही कार काही मोजक्याच लोकांकडे पाहायला मिळते. ही एक स्पोर्ट्स इलेक्ट्रिक कार आहे. ही गाडी स्पोर्ट सलून, स्पोर्ट टुरिस्मो आणि क्रॉस टुरिस्मो या तीन व्हेरियंटमध्ये विकली जात आहे. या गाडीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हिचा स्पीड. ही गाडी खूपच आलिशान आहे.
स्टायलिश आणि स्पोर्टी लुकमुळे ही गाडी श्रीमंतांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. 4,963 मिमी लांबी, 1,966 मिमी रुंदी, 1,379 मिमी उंची आणि 2,900 मिमी व्हीलबेससह, पोर्श टायकन उत्तम राइडिंग अनुभव देते. पोर्शची उत्कृष्ट इलेक्ट्रिक कार 79.2 kWh बॅटरी बॅकसह येते. हा बॅटरी पॅक कारला चांगला परफॉर्मन्स देण्यास मदत करतो.
एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर, पोर्श टायकन 678 किलोमीटरचे अंतर कापू शकते. ही गाडी अवघ्या काही सेकंदात शंभर किलोमीटर प्रतितासचा वेग घेते. या आलिशान गाडीत असलेले फीचर्स खूपच प्रीमियम आहेत.
या गाडीमध्ये सीट हीटिंग, ISOFIX, अँटी थेफ्ट व्हील बोल्स्टर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स, हेड रेस्ट, मल्टीफंक्शन स्पोर्ट्स स्टीयरिंग व्हील, थ्री-पॉइंट ऑटोमॅटिक सीट बेल्ट, फॅब्रिक रूफ लाइनिंग, ट्रॅफिक साइन रेकग्निशन, पार्क असे भन्नाट फीचर्स पाहायला मिळतात. असिस्ट, रिव्हर्सिंग कॅमेरा, लेन किपिंग असिस्ट, लेन किपिंग आणि ऍक्टिव्ह स्पीड लिमिट असिस्ट यांसारखें अपडेटेड फीचर्स देखील यामध्ये आहेत.
किंमत किती आहे ?
या गाडीची किंमत ही करोडोच्या घरात आहे. या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड ताशी 230 किलोमीटर आहे. किमती बाबत बोलायचं झालं तर या प्रीमियम कारची भारतात 1.61 कोटी ते 2.44 कोटी एवढी एक्स शोरूम किंमत आहे. अर्थातच ऑन रोड प्राईस ही यापेक्षा अधिक राहणार आहे.