विखे-कोल्हे या बड्या नावांमुळे इच्छुकांना धडकी, शिक्षक मतदार निवडणुकीसाठी पुन्हा ‘तांबे पॅटर्न’? अहमदनगरमधून ‘असे’ फिरतेय राजकारण

Published on -

विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आतापासूनच ‘रण’संग्राम पेटलेला दिसून येतोय. कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे, विद्यमान आमदार किशोर दराडे, विखे परिवारातील डॉ. राजेंद्र विखे आदी ‘बड्या’ नेत्यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली आहे.

ही बडी नावे पाहिल्यावर इच्छुकांच्या यादीतील अन्य नावांना मात्र धडकी भरली आहे. आपले काय होणार, अशी अस्वस्थता त्यांच्यात असल्याने यंदाही शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवार वाढून निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली होती. परंतु निवडणूक आयोगाने ती पुढे ढकलली. आधी जाहीर होऊन नंतर पुढे ढकलली गेली असली तरी ही निवडणूक होणार हे निश्चित आहे व त्यामुळेच इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.

शिक्षक लोकशाही आघाडीला महत्त्व
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे व उद्धव ठाकरे गटाच्या विद्यमान आमदारासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांनी टीडीएफकडून उमेदवारी मागितल्याने पुन्हा एकदा नाशिक शिक्षक मतदारसंघात पक्षांपेक्षा शिक्षक लोकशाही आघाडीलाच (टीडीएफ) महत्त्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या समितीने लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिर्डीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

तांबे पॅटर्नचा आदर्श ?
पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस वा भाजप अशा दोन्ही पक्षांच्या उमेदवारीचा पर्याय असतानाही शिक्षक लोकशाही आघाडी समर्थक मते मिळावीत म्हणून अपक्ष निवडणूक लढवली. त्याच पॅटर्ननुसार आता जिल्ह्यातून विवेक कोल्हे व डॉ. राजेंद्र विखे यांच्या उमेदवारीची शक्यता आहे. अशा स्थितीत विद्यमान आमदार दराडे काय करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कोल्हेंपाठोपाठ विखेही मैदानात
कोपरगावचे विद्यामान आमदार आशुतोष काळे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटात सहभागी झाल्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने कोपरगावचा तिढा सुटल्याचे मानले जात होते.

मात्र, डॉ. विखेंनीही शड्डू ठोकल्याने मागील वर्षभरापासून रंगत असलेला कोल्हे-विखे वाद पुन्हा नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे. डॉ. राजेंद्र विखे हे प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी करावी, असा आग्रह सहकाऱ्यांकडून सुरू आहे. मतदार नोंदणीस यापूर्वीच सुरुवात केली आहे.

त्यामुळे माझी उमेदवारी निश्चित आहे, असे म्हटले तरी चालेल व मी तयारी सुरू केली आहे, असेही डॉ. विखेंनी स्पष्ट केल्याने आता तीन बडी नावे स्पष्ट झाली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe