Ahmednagar News : आरोग्य विभाग हा रुग्णांसाठी विविध उपाययोजना व नवनवीन योजना आणत असतो. आता रुग्णांसाठी एक अत्यतं फायदेशीर ठरणारी योजना आरोग्यविभाग आणत आहे. ई-संजीवनी कार्यक्रम ही ती योजना असेल. यामध्ये रुग्णांना दूरध्वनीवर किंवा ऑनलाइन वैद्यकीय सल्ला घेता येणार आहे.
आरोग्य विभागाने ही योजना अंमलात आणली असून प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेल्यावर रुग्णांना नाशिक येथील कॉल सेंटरवरून आजारांवरील उपचारांची माहिती मिळू शकेल. देशातील हजारो आरोग्य केंद्रांद्वारे या योजनेचा लाभ रुग्णांना दिला जात आहे. ई-संजीवनी या महत्वाकांक्षी उपक्रमाची दुसरी आवृत्ती म्हणजे ई संजीवनी ओपीडी टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म आहे.

याची सुरूवात १३ एप्रिल २०२० पासून झाली आहे. ई- संजीवनी ओपीडीमध्ये रुग्णाच्या चाचणी अहवालाची तपासणी केल्यानंतर सल्लामसलत करण्याचीही सुविधा आहे. रुग्ण त्याच्या चाचणी अहवालाचा फोटो क्लिक करून अपलोड करू शकतो. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी खासगी डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. विशेषतः सर्दी, डोकेदुखी पोटदुखी सारख्या आजारांच्या रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे.
आरोग्य विभागाने नाशिक येथे तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्त्ती केलेली आहे. हे डॉक्टर ई-संजीवनी उपक्रमाद्वारे रुग्णांना ऑनलाइन वैद्यकीय सेवा देण्याचे काम करतात. त्याकरिता रुग्णांना त्यांच्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे आहे. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुढील सुविधा प्रदान केली जाते.
कसा घेता येईल फायदा?
मोबाइलवर या योजनेचे अॅप डाऊनलोड करावे लागते. त्यासाठी सुरुवातीस प्ले स्टोअरमधून ई-संजीवनी अॅप उपलब्ध आहे. त्यावर मोबाइल क्रमांक नोंदवावा लागतो. लॉगिन केल्यानंतर रुग्णाची माहिती भरावी लागते. त्यानंतर वैद्यकीय सल्ला मिळतो.