आमदार शिवाजी कर्डिले यांनी ‘त्या’ डॉक्टरला खडसावले

Ahmednagarlive24
Published:

राहुरी :- अपघातात ठार झालेल्या तरुणाच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना तब्बल १० तासांहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागल्याने ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला.

तालुक्यातील म्हैसगाव येथील सुरेश श्रीरंग नेहे (वय ३५) यांचा मंगळवारी रात्री १० च्या सुमारास म्हैसगाव-राहुरी मार्गावरील केदारेश्वर घाटात अपघात होऊन ते ठार झाले.

नेहे यांचा मृतदेह रात्री पावणेअकरा वाजता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनासाठी नेहे यांच्या नातेवाईकांना बुधवारी सकाळी नऊपर्यंत मृतदेहाला राखण बसावे लागले. सकाळी कार्यकर्त्यांनी हा गंभीर प्रकार आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कानावर घातला.

त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील डाॅक्टरांशी फोनवर संपर्क साधत शवविच्छेदन केंद्रात बोलावून घेत कामाच्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे खडेबोल सुनावले. असा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

अपघातात ठार झालेल्या, तसेच इतर घटनांत मृत्यू पावलेल्यांच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना तास-तास प्रतीक्षा करावी लागण्याची दुर्दैवी वेळ यापूर्वी अनेकांवर आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक याकडे गांभीर्याने पहात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. शवविच्छेदन केंद्रात ओळख पटवण्यासाठी ठेवलेल्या मृतदेहाचे उंदीर व घुशीने लचके तोडल्याचे प्रकार घडलेले असताना या केंद्राची दुरवस्था ‘जैसे थे’च आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment