अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोना स्फोटच झाला आहे. झेडपीच्या एका कर्मचार्याचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला असून वरिष्ठ अधिकार्यांसह आणखी चार कर्मचारी कोरोना बाधित सापडले आहेत.
यामुळे आठ दिवसांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्यालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा परिषदेत १५ दिवसांपूर्वी पहिला कोरोना बाधित कर्मचारी आढळला होता.
त्यानंतर मागील आठवड्यात एका वरिष्ठ अधिकार्याचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे मागील आठवड्यात जिल्हा परिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते.
दरम्यान, काल सोमवारी जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ अधिकार्यांसह आणखी चार कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळले.
त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा परिषदेचे कामकाज आणखी आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
जिल्हा परिषद कर्मचार्यांमध्ये लोकप्रिय आणि सर्वांना मदत करणार, नेहमी हसतमुख असणार्या कर्मचार्यांचा सोमवारी नगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या कर्मचार्याला निमोणिया झाला होता. दरम्यान, रात्री उशीरा या कर्मचार्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तत्पूर्वी संबंधीत कर्मचार्यांच्या मृत्यूची बातमी वार्यासारखी जिल्हा परिषदेच्या वर्तुळात पसरली
आणि एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. बाधित आढळलेल्या चार कर्मचार्यांमध्ये दोन कर्मचारी हे पदाधिकार्यांकडील असून उर्वरित दोघे हे दोन स्वत: विभागातील आहेत.
आता या कर्मचार्यांच्या संपर्कात कोण-कोण आहेत, त्यांची चाचणी करणे आवश्यक झाले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात हजारांच्या संख्याने जिल्हा भरातून लोक जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आले होते.
या लोकांना मज्जाव केल्यानंतर देखील ते मुख्यालयात येत होते. यामुळे जिल्हा परिषदेतील कोरोना संसर्गाचा धोका वाढला असून अनेकांनी स्वत: कोरोनाची चाचणी करून घेण्यास सुरूवात केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा