अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- नगर शहर व शहरातील रस्त्यांवरील खड्डे यांचे नाते अगदी जुने असून या नात्याचा विसरच पडू न देण्याची शपथ महानगर पालिकेने घेतली आहे कि काय असा प्रश्नच नगरकरांना पडतो आहे.
नगर शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले असून, यामुळे नगरकरांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. महापालिकेकडून नागरी सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचे वाभाडे व्हॉटसअॅप पोस्टच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल होत आहेत.
खड्डेच खड्डे चोहीकडे…मनपा पदाधिकारी व प्रशासन गेले कुठे?, असा सवाल या पोस्टमध्ये करण्यात आला असून, नगर शहरातील रस्त्यांची अवस्था रस्त्यात खड्डे नाही तर खड्डयात रस्ते अशी झाल्याचा दावा केला गेला आहे. इतर जिल्हे स्मार्टसिटीच्या दिशेने आगेकूच करत आहे.
मात्र नगर शहरातील लोकप्रतिनिधींना शहराचा विकास तर सोडा ‘विकास’ हा शब्दच माहित आहे कि नाही असा संतप्त सवाल नगरकर विचारू लागले आहे. सत्ताधाऱ्यांकडून एकीकडे विकासाच्या मोठमोठ्या बढाया मारत असतात, पण साधे रस्तेही त्यांना नीट करता येत नाहीत.
सध्या कोरोना काळात नगरकरांना दिलासा देण्यात अपयशी ठरलेल्या मनपाचे मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याच्या कामांकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आज नगर शहरात एकही रस्ता खड्डेमुक्त दिसत नाहीत. नव्याने केलेले रस्तेही दोन चार पावसातच वाहून गेले आहेत.
नगरकरांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकल्यावर तरी मुर्दाड प्रशासनाला जाग यावी, हीच अपेक्षा असल्याचेही या पोस्टमध्ये आवर्जून स्पष्ट केले गेले आहे. रस्त्यांची अवस्था पाहता नगरकर कायमच खड्डयात असतात, लोकप्रतिनिधी व मनपा अधिकारी फक्त आश्वासने देतात करीत काहीच नाहीत, रोज अपघात होतात, गाड्या अचानक स्लिप होतात,
दिवसभर नगर शहरातील रस्त्यांवर गाडी चालवल्यावर हाडे खिळखिळी होतात, अशा प्रतिक्रिया नागरिक deu लागले आहे. नेहमी मान्सून पूर्व रस्त्यांची दुरस्ती केली जात असत मात्र यंदाच्या वर्षी निम्मा पावसाळा होऊन देखील रस्त्यांची डागडुजी झालेली पाहायला मिळाली नाही.
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे दरवर्षीचे काम यंदा महापालिकेने केलेच नाही. यातून कोट्यवधीचा खर्च वाचल्याचे समाधान महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना असले तरी दुसरीकडे खड्ड्यांमुळे होणारे शारीरिक त्रास सहन करण्याची वेळ मात्र नगरकरांवर आली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved