अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.
तसेच श्री साईबाबांच्या हयातीपासून आजतगायत चालू असलेली गुरुवारची पालखी मार्च महिन्यात लॉकडाऊनपासून बंद आहे. ही पालखी सुरु करण्यात यावी अशी मागणी शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, साई निर्माणचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, गटनेते अशोक गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदन पत्रात म्हटले आहे की, साईबाबांच्या हयातीपासून दर गुरुवारी द्वारकामाईतून पालखी काढण्यात येत आहे.
मात्र मार्च महिन्यापासून सदरचा पालखी सोहळा बंद करण्यात आला आहे. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर शेगाव आदी ठिकाणच्या देवस्थानांप्रमाणे शिर्डीतील साईबाबांची दर गुरूवारची पालखी संस्थानमार्फत कमीत कमी पुजारी तसेच पालखीसाठी लागणारे
कर्मचारी यांंच्यासह भक्तांसाठी लाईव्ह दर्शन व्यवस्था सुरू करावी यासाठी आम्ही शिर्डी ग्रामस्थ आपल्याला सहकार्य करू, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर आगामी काळात भाविकांना दर्शनासाठी खुले
करण्यासाठीच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकारी तिरुपती येथे रवाना झाले होते. तेथे तिरुपती संस्थानच्या प्रशासकीय अधिकार्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच. बगाटे यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved