Ahmednagar News : सध्या एकीकडे नागरिकांना मान्सूनचे वेध लागले आहेत तर दुसरीकडे तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीसह उत्तर भारतातील जनता होरपळून निघत आहे. राजधानी दिल्लीतील तापमानाने तर आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.
येथील मुंगेशपूर या भागात बुधवारी सर्वाधिक विक्रमी ५२.९ अंश सेल्सिअसच्या ऐतिहासिक तापमानाची नोंद करण्यात आली. यापूर्वी २०१६ साली राजस्थानच्या फलोदी येथे नोंदवण्यात आलेले ५१ अंश सेल्सिअस हे देशातील उच्चांकी तापमान होते. दिल्लीत पाऱ्याने हा विक्रम मोडला आहे. राजस्थान आणि बिहारमध्येही उष्णतेने कहर केला. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे जवळपास ८० विद्यार्थ्यांना उष्माघाताच्या त्रासाला सामोरे जावे लागले.

वाढत्या तापमानामुळे बिहारमधील सर्व खासगी आणि सरकारी शाळा, कोचिंग संस्था व अंगणवाडी केंद्र ८ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश नितीश कुमार सरकारने दिले आहेत.
राज्यातील विदर्भआणि कोकण-गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे नागपूर, वर्धा, चंद्रपूर यांसह पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बुधवारी ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून पुढील ४८ तासांत विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर तर कोकण-गोव्यातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.नागपूर शहरातील सदर,पाचपावली, कळमना, अजनी, नंदनवन आणि धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत सहा अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झाला असून या सहाही व्यक्तींचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यात मंगळवारी तिघांचा, तर बुधवारी तिघांचा, असा सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीसह उत्तर भारतातील जनता होरपळून निघत आहे. दिल्लीच्या मुंगेशपूर भागात मंगळवारी सर्वाधिक विक्रमी ४९.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. परंतु बुधवारी दुपारी चार वाजून १४ मिनिटांच्या सुमारास याठिकाणी आतापर्यंतचे विक्रमी ५२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आल्याचे हवामान विभागाने सांगितले.
दिल्लीतील विविध हवामान केंद्रांवर बुधवारी कमाल तापमानाची नोंद ४५.२ अंश सेल्सिअस ते ४९.१ अंश सेल्सिअसदरम्यान असताना मुंगेशपूर येथील ५२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आली आहे.