Ahmednagar News : निसर्गाने मानवाला भरभरून वरदान दिले आहे. माणसाची घेण्याची शक्ती, कुवत संपेल परंतु निसर्गाचे हात रिते होत नाहीत. हिरवेगार डोंगर झाडे, वेली, पशु, पक्षी काय काय बघावे आणि कितीदा बघावे. निसर्ग सौंदर्य बघून डोळ्याचे पारणे फिटते पण वारंवार पहात रहावे डोळ्यात मनात साठवत ते सौंदर्य हृदयात जतन केले जाते.
त्यामुळे निसर्गाचे मानवावर खूप ऋण आहेत. निसर्ग शक्तीचे हे ऋण फेडण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथील लव्हाळवाडी येथे आदिवासी बांधव पारंपरिक बोहडा हा उत्सव साजरा करतात. यावेळी देवीला गोड नैवेद्याचा प्रसाद अर्पण करण्यात येतो.
यंदा देखील हा उत्सव साजरा उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा पाऊस चांगला पडावा, गावावर रोगराईचे संकट येऊ नये, आपली मुलं-बाळं चांगली राहावी, गुरा-ढोरांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा, अशी प्रार्थना या बोहड्याच्या निमित्ताने देवीपुढे केली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उत्सवा दरम्यान हजारो वर्षांपूर्वीपासून आदिवासी देवी-देवता, राक्षस, पक्षी, प्राणी यांचे मुखवठे चेहऱ्यावर धारण करत नृत्य करतात. निसर्ग शक्तीचे ऋण फेडण्यासाठी हा नृत्याचा उत्सव साजरा होत होता. त्यातील काही पंरपरा आजही प्रचलीत असल्याचे दिसून येते. बोहडा हा त्यातीलच एक भाग समजला जातो.
ही पंरपरा गेली अनेक वर्षापासून सुरु आहे. मुखवट्यांचे नृत्यनाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे ‘बोहाडा’ हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रात्री या उत्सवालासुरुवात होते. निसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून आदिवासींचे पारंपरिक वाद्यअसलेल्या वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढली जाते.
काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात. अशाच प्रकारच्या बोहड्याचे आयोजन नुकतेच लव्हाळवाडी येथे केले होते. गणपतीच्या सोंगापासून बोहड्याला सुरुवात झाली. त्यानंतर शारदादेवीच्या सोंगाने संबळ वाद्याच्या ठेक्यावर ताल धरला होता.
त्यानंतर खंडेराव, विष्णू, पवन देव, ब्रम्हदेव, बकासूर, नरकासूर, वीरभद्र, वेताळ, बली, पांडवताटी, भीष्म, वाली, सुग्रीव, राम-लक्ष्मण, रावण, अहिरावण-महिरावण, नरकासूर, पुतना मावशी, नारद अशा वेगवेगळ्या पौराणिक सोंगानी आपली कला सादर केली. सकाळी सात वाजता देवीची मिरवणूक काढण्यात आली.
विधीवत पुजा सुरु असतानाच अनेक भाविकांनी कबुल केलेले नवस फेडले. ठाणे, नाशिक जिल्ह्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातुनही मोठ्या प्रमाणात नागरीक लव्हाळवाडीतील बोहड्यासाठी उपस्थित होते.