Ahmednagar News : समन्यायी पाणी वाटप कायद्याने जायकवाडी लाभक्षेत्राला यापुर्वीच पाणी देण्यात आले आहे. तरीही पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पुन्हा पाणी सोडणे हे लाभक्षेत्रातील इतर तालुक्यावर अन्याय आहे. गंगापूर, वैजापूर तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई दाखवून, हक्काचे पाणी जलदगती कालव्यात सोडण्याच्या निर्णयाविरोधात, राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना चांगलेच धारेवर धरले. हक्काचे पाणी देऊन राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
गोदावरी धरण समूहातून वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांची भेट घेत जलदगती कालव्यात सुरू केलेले आवर्तन तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्याने जायकवाडी लाभक्षेत्राला यापुर्वीच पाणी देण्यात आले आहे. तरीही पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पुन्हा पाणी सोडणे हे लाभक्षेत्रातील इतर तालुक्यावर अन्याय करण्यासारखे असल्याची बाब संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी संचालकांच्या निदर्शनास आणून दिली.
एकीकडे धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यानुसार कालवा सल्लागार समितीने आवर्तनाचे नियोजन केले होते. तसेच या आवर्तनावरच या भागातील शेतीक्षेत्राचे भवितव्य अवलंबून होते; परंतु अचानक गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याचा निर्णय करून कालवा सल्लागार समितीच्या निर्णयालाही विरोध केला आहे.
या समितीला तसेच लोकप्रतिनिधींना हे लाभक्षेत्रातील इतर तालुक्यावर अन्याय करण्यासारखे असल्याची बाब संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी संचालकांच्या निदर्शनास आणून दिली. एकीकडे धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यानुसार विश्वासात न घेता पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय उर्वरीत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा ठरला असल्याच्या भावना शिष्टमंडळाने बोलून दाखविल्या.
समन्यायी पाणी वाटप कायद्याने जायकवाडीत यापूर्वीच नगरसह नाशिक जिल्ह्यातील धरणातुन पाणी सोडले होते. मात्र आता जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने आणखी पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.