Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक संपताच आता विविध निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. अगदी झेडपी, पंचायत समितींच्याही निवडणूक होतील दरम्यान आता विधानसभेच्या सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठीची निवडणूक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिक्षक मतदारसंघातील निवडणूक २६ जून रोजी होणार असून त्या झाल्या की लगेच विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या ११ विद्यमान सदस्यांच्या आमदारकीची सहा वर्षांची मुदत जुलैअखेर संपणार असल्याने जून महिन्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.
अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठीची निवडणूक २५ जून रोजी होणार आहे. ११ आमदार विधानसभा सदस्यांमधून निवडून जाणार असल्याने अर्थातच महायुतीचा दबदबा असेल. चार आमदारांच्या निधनामुळे आणि एकाच्या राजीनाम्यामुळे विधानसभेच्या पाच जागा रिक्त आहेत.
तसेच १४ विधानसभा सदस्य लोकसभेची निवडणूक लढत आहेत. त्यातील जे खासदार म्हणून जिंकतील त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. ही सगळी संख्या गृहीत धरून विधान परिषद निवडणुकीसाठीचा मतांचा कोटा निश्चित केला जाईल. महायुतीचे संख्याबळ लक्षात घेता ११ पैकी ८ ते ९ जागा ते लढतील असे मानले जाते.
या आमदारांचा कार्यकाळ संपणार
बाबाजानी दुर्राणी (अजित पवार गट), वजाहर मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), मनीषा कायंदे (शिंदेसेना), अनिल परब (उद्धवसेना), भाई गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), जयंत पाटील (शेकाप) आणि महादेव जानकर (रासप) या ११ विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपणार आहे.
महामंडळांवरील नियुक्त्याही..
राज्य सरकारची महामंडळे आणि विविध समित्यांवरील रखडलेल्या नियुक्त्या लोकसभा निकालानंतर लगेच करण्यात येतील. भाजपला ५० टक्के पदे तर शिंदेसेनेला २५ टक्के आणि अजित पवार गटाला २५ टक्के पदे हा फॉर्म्युला येथे वापरला जाणार आहे.