Ahmednagar News : हत्याकांडाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आरोपीने पोटदुखीचा बहाणा करून पोलिसांकडून त्यास रुग्णालयात दाखल करत असतानाच या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव येथील कारागृहातील मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी योगेश पारधे हा फरार झाला आहे. दरम्यान आरोपी पारधे याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहता तालुक्यातील शिर्डी येथे बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजली म्हणून सागर शेजवळ या दलीत तरुणाची २०१५ मध्ये हत्या करण्यात आली होती. यातील नऊ आरोपींपैकी योगेश पारधे ( रा. कोल्हार, ता. राहाता, जि. अ.नगर ) हा एक आरोपी सध्या कोपरगाव येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे.
मध्यरात्री योगेश पारधे याने पोटात दुखत असल्याचे सांगत रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती कारागृह प्रशासनाकडे केली. यावेळी रुग्णालयात नेत असताना त्याने ड्युटीवरील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
दरम्यान, यापूर्वी कोपरगाव कारागृहात आरोपींकडे मोबाईल सापडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता जेलमधून थेट आरोपीच पळून गेल्याने कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान यापूर्वी देखील संगनमनेर उपकारागृहाचे गज कापून काही आरोपींनी धूम ठोकल्याची घटना घडली होती.
आता परत एकदा पोलिसांच्या हातातून आरोपी पळून गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, या आरोपीला लवकरात लवकर शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.