Ahmednagar Politics : दादा की नेते? उद्याच्या निकालाआधीच जुळली काही गणिते, पहा गुलाल कुणाचा..

Ahmednagarlive24 office
Published:
lanke vikhe

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत. कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अहमदनगर आणि शिर्डी मतदारसंघासाठी एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणी होणार आहे.

‘गुलाल आमचाच’ असे म्हणत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. अहमदनगर मतदारसंघात, तर अनेकांनी दादा (विखे) आणि नेते (लंके) यांच्या विजयावर पैंजा लावल्या आहेत. या निकालाकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या उमेदवारीने तिरंगी लढत झाली असली तरी खरी लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे व उद्धव ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात झाली.

आता निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असून विखे की लंके या अस्तित्वाच्या लढाईत कोण विजयी होणार तर लोखंडे हॅट्रिक करणार की वाकचौरे बाजी मारणार हे आता मंगळवारी स्पष्ट होणार आहे. नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात घासून निवडणूक झाली आहे. त्यामुळे कोण विजयीची माळ गळ्यात घालणार हे सांगणे अवघड आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विखे यांची बाजू तशी भक्कम होती. बुथस्तरावर असलेली मोठी यंत्रणा, भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे गट) यासह चार विद्यमान आमदार व विखेंची स्वतंत्र यंत्रणा एवढी मोठी फौज डॉ. सुजय विखेंसाठी परिश्रम घेत होती. त्या मानाने विरोधी नीलेश लंके यांच्याकडे उमेदवारीचे चिन्हच नवे, बुथस्तरावर पारनेर वगळता अन्यत्र यंत्रणाच नव्हती.

अर्थात सुरवातीला विखेंचा एकतर्फी विजय होईल, असे वाटत असतांना लंके यांनी विखेंसमोर जोरदार आव्हान दिले. त्यामुळे ही लढत आता विखे व लंके यांच्यासाठी अस्तित्वाची लढाईच झाली आहे. त्यात कोण विजयी होणार हे आता मंगळवारी दुपारनंतर स्पष्ट होणार आहे. यात यंदा या मतदारसंघात मतदानाचा टक्का चांगलाच वाढला आहे. आता हा टक्का कोणाच्या बाजूने झुकला हे देखील मंगळवारी दिसून येईल.

एक नजर मतदानावर
पारनेर – 70.13 टक्के
राहुरी – 70.00 टक्के
श्रीगोंदा- 67.90 टक्के
कर्जत – जामखेड – 66.19
शेवगाव- 63.03 टक्के
अहमदनगर शहर- 62.50 टक्के
एकूण मतदान – 66.61 टक्के

मतदार कुणाची प्रतिष्ठा अबाधित ठेवणार?
ही निवडणूक आता केवळ लंके विरुद्ध विखे अशी राहिलेली नाही. पवार विरुद्ध विखे व प्रतिष्ठा विरोधात अस्तित्व अशी लढत झाल्याने आता नगर दक्षिणचे मतदार नेमकी कुणाची प्रतिष्ठा अबाधित ठेवतील हे अवघ्या काही तासात समोर येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe