Ahmednagar News : काहीतरी वेगळे करण्याची जिद्द, आत्मविश्वास व प्रतिकूलतेशी संघर्ष करण्याची तयारी ठेवल्यास हमखास यश मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील ऊसतोडणी कामगारांचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या पालवेवाडी येथील तोडणी कामगार असलेल्या संतोष शेषराव पालवे यांचे. या कुटुंबाने फळबागे सारख्या शेतीपूरक उद्योगात प्रचंड मेहनत व सेंद्रिय शेतीच्या जोरावर यावर्षी दहा टन केशर आंबा अमेरिकेमध्ये निर्यात करून निर्यातीच्या क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकले आहे.
आजवर पाथर्डी तालुका तोडणी कामगारांचा म्हणून राज्याला परिचित असून, त्याच तालुक्यातील एक कामगार या चक्रव्युहातून बाहेर पडत यशस्वी होत आहे.

तालुक्याचा जवळजवळ मोठा भाग ऊस तोडणी कामगारांचा म्हणून परिचित आहे. डोंगराळ, दुर्गम व सततच्या दुष्काळी म्हणून असलेल्या पालवेवाडी गावातील सुमारे दहा वर्षांपूर्वी शेषराव पालवे यांनी अत्यंत हलक्या, नापीक असणाऱ्या स्वतःच्या जमिनीत सुमारे साडेआठ एकर क्षेत्रावर फळबाग लावली. आंब्यासाठी तालुक्याची बाजारपेठ पाहता गावरान, केशर, हापूस, लंगडा, राजापुरी, वनराज, सदाबहार, आम्रपाली, तोतापुरी, अशा विविध प्रकारच्या आंब्याची सुमारे तेराशे झाडे लावली. यासाठी शेततळे करून पाणी साठवत सर्वत्र ठिबक सिंचन केले.
कालांतराने घरात शेती कामासाठी माणसे कमी पडत असल्याने पैठण येथे खाजगी संस्थेत शिक्षकी नोकरी करत असलेल्या संतोष पालवे यांनी शिक्षकाची नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती शेतीसाठी वाहून घेतले.
आंबा काढणीनंतर त्याची पारंपारिक पद्धतीने (बारदाना, वृत्तपत्राची रद्दी व गवताच्या साह्याने) मोठ्या हॉलमध्ये नैसर्गिक आंबे पिकवण्यासाठी आढी लावली जाते.
यामध्ये विविध कप्पे असून, पिकलेला माल विक्रीसाठी बाजारात जातो. घरातील सर्व नऊ व्यक्ती पहाटे चारपासून शेतीत काम करतात. शेणखताचा वेळोवेळी वापर होत असल्याने सर्व पिकांचे दर्जेदार उत्पादन होत आहे. सेंद्रिय शेती व फळांचे महत्त्व सिद्ध झाल्याने बाजारपेठ सहजपणे उपलब्ध झाली. यंदा तर दहा टन केशर आंबा अमेरिकेत निर्यात झाला. काहीतरी वेगळे करण्याची जिद्द, आत्मविश्वास व प्रतिकूलतेशी संघर्ष करण्याची तयारी ठेवत पालवे कुटुंबाने ऊस तोडणी कामगारमुक्त जीवन जगण्यासाठी धाडसी पाऊल उचलत कृषी उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बाजारपेठेचा अभ्यास करत आता त्यांना स्वतः निर्यातदार होण्याचे वेध लागले आहे.












