Ahmednagar News : कोल्हार भगवतीपूरला वादळाचा तडाखा, मोठमोठे वृक्ष आडवे ; शेडवरील पत्रे उडाले

Published on -

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूरमध्ये सोमवारी विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडासह अवघा १० मिनिटे वळव्याचा पाऊस झाला. मात्र सोसाट्याच्या वारा व वादळाने मोठमोठे वृक्ष उन्मळून रस्त्यावर आडवे झाले. अनेक शेडवरील पत्रे दूरवर उडून पडल्याने पहिल्याच पावसाने कमी पण वादळाच्या तडाख्याने जास्त दाणादाण उडविली.

सायंकाळी पाच नंतर अचानक आभाळ झाकोळले आणि काही मिनिटेच आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने कहर केला. कोल्हार-लोणी रस्त्यावरील अनेक रसवंती गृहाच्या शेड असणाऱ्या टपऱ्या या वादळाने उडून पडल्या. तर मोठमोठे वृक्ष आडवे झाले. वाड्यावस्त्यांवरील अनेक झाडे आडवी झाली.

सोबत छोट्यामोठ्या टपऱ्याही वेगाने आलेल्या वाऱ्याने उडाल्या. लोणी पोलीस तातडीने जेसीबीच्या सहाय्य रस्त्यावरील आडवी झालेली मोठी झाडे बाजूला करीत तुंबलेली वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. पहिल्याच पावसात अनेकांचे आर्थिक नुकसान झाले तर रस्त्याच्या कडेला उभी असलेली मोठमोठे वृक्ष जमीनदोस्त झाले.

अवघ्या दहा मिनिटात वादळाने खेळ केल्याने अनेकांचे नुकसान तर जुनी वृक्ष संपदा नष्ट झाली. कोल्हार-राजुरी रस्त्यावर अनेक विजेचे खांब आडवे झाल्याने गावातील विद्युतपुरवठा खंडित झाला. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पोल उभे करण्याचा प्रयत्न उशिरापर्यंत करीत होते. अचानक आलेल्या या पावसाने उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला तर हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र वादळाने जास्त नुकसान झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News