Ahmednagar News : तीन वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेली केस मागे घेतली नाही म्हणून शेतात काम करणाऱ्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर धारदार हत्याराने वार करत अत्याचार केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित महिला ही रविवारी संध्याकाळी तिच्या शेतात भुईमुगाच्या शेंगा काढत होती. या वेळी आरोपीने तेथे आला व फिर्यादी महिलेला सुमारे ३ वर्षापुर्वी कोर्टात दाखल केलेली केस दि. १५ मे रोजीच्या तारखेला मिटवुन का घेतली नाही, असा प्रश्न विचारत तू जर केस मिटवुन घेतली नाही तर तुला व तुझ्या दोन्ही मुलांना जीवे ठार मारीन तसेच तुझ्या घरात दिवा लावायला माणूस ठेवणार नाही. अशी धमकी देत महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण करुन धारधार हत्याराने फिर्यादीवर वार करत फिर्यादीला गंभीर जखमी केले.
या वेळी फिर्यादीने आरडा ओरड सुरू केल्याने आरोपीने फिर्यादीचे तोंड दाबुन फिर्यादीवर बळजबरीने अत्याचार केला. या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.